राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलला, सांस्कृतिक विभागाची माहिती

मुंबई : पहलगाममध्ये (Pahalgam attack) 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत २५ एप्रिल रोजी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या (Cultural Department) वतीने डोम, एन एस सी आय, वरळी येथे आयोजित करण्यात आलेला गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) स्वर्गीय राज कपूर आणि स्वर्गीय व्ही.शांताराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार २०२४’ तसेच राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्याची नवीन तारीख यथावकाश कळवण्यात येईल, असे शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
दरम्यान, यावर्षीचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रौप्य पदक असे आहे. यावर्षी चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ६ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रौप्य पदक असे आहे.
मोठी बातमी! BSF जवानाने बॉर्डर ओलांडली; पाकिस्तानी रेंजर्सने घेतलं ताब्यात…
तर हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रौप्य पदक असे आहे.
17 एप्रिल रोजी मंत्री आशिष शेलार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली होती. हे पुरस्कार वितरण २५ एप्रिल रोजी वितरीत करण्यात येणार होते. मात्र, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक विभागाचा हा पुरस्कार वितरण सोहळा पुढं ढकलला आहे. या कार्यक्रमाची तारीख लवकरच कळवली जाणार आहे.