मराठी सिनेमा डंका आता दक्षिणात्य भाषेत; दशावतार सिनेमा मल्याळी भाषेत होणार रिलिज
झी स्टुडियोज ची प्रस्तुती असलेला आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेला, ‘दशावतार’ लवकरच पडद्यावर
गेल्या काही महिन्यांपासून सिनेमागृहांमध्ये प्रचंड प्रतिसादात सुरु असलेला आणि जगभर गाजत असलेला ‘दशावतार’ हा चित्रपट आता मल्याळी भाषेत अवतरत आहे. (Film) या आठवड्यात चित्रपटाचे थिएटर मध्ये ५० दिवस पूर्ण होत असताना मल्याळी भाषेत या चित्रपटाचे पदार्पण हा एक चांगला शर्करा योग आहे.
झी स्टुडियोज ची प्रस्तुती असलेला आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेला, सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘दशावतार’ हा चित्रपट १२ सप्टेंबर ला सिनेमागृहात आला आणि त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. महाराष्ट्रासोबतच बडोदा, इंदौर, हैद्राबाद, बंगळुरु, दिल्ली ते थेट गुवाहाटीमध्ये ‘दशावतार’ हाऊसफुल होऊ लागला. मराठी भाषेच्या सीमा ओलांडून देशभरातल्या अनेक अमराठी रसिकांनी देखील ह्या चित्रपटाचा आस्वाद घेतला आणि कौतुकही केलं.
ब्रेकिंग : साराभाई Vs साराभाई फेम अभिनेते सतीश शाह यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलिया, जपान पर्यंत आणि संयुक्त अरब अमीरातीपासून ते जर्मनी, नॅार्वे पर्यंत सगळीकडे हा चित्रपट हाऊसफुल गर्दीत पाहिला जाऊ लागला. सातव्या आठवड्यात प्रवेश करुन आजही तो अनेक चित्रपटगृहात हाऊसफुल गर्दीत सुरु आहे. ह्या साऱ्याचा परिणाम असा की, दशावतार चित्रपटाबद्दल इतर भाषिक प्रेक्षकांमध्येही मोठं कुतूहल निर्माण झालं आणि त्यामुळेच केरळमधील प्रेक्षकांच्या आग्रहाखातर तो आता मल्याळी भाषेतूनही प्रदर्शित होणार आहे.
दर्जेदार चित्रपटांसाठी नावाजल्या जाणाऱ्या मल्याळी चित्रपटसृष्टीत आता ‘दशावतार’ सहभागी होणार आहे.मॅक्स मार्केटिंग ही वरुण गुप्ता ह्यांची संस्था मल्याळी भाषेत हा चित्रपट सादर करणार आहे. नुकतंच ह्या चित्रपटाचं ‘मल्याळी’ भाषेतलं पोस्टर प्रदर्शित झालं आणि २१ नोव्हेंबर रोजी ‘दशावतार’ केरळमध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपट मल्याळी भाषेतून केरळमध्ये प्रदर्शित होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. ‘उत्तम कथा व सादरीकरणाच्या जोरावर मराठी चित्रपट आपल्या कक्षा रुंदावत मोठी झेप घेऊ शकतो’ हे ‘दशावतार’ ने सार्थ करुन दाखवलं आहे.
