नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची लाट, पुढील काही दिवस थंडी राहणार

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची लाट, पुढील काही दिवस थंडी राहणार

मुंबई : नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात देशभरात थंडीची लाट पसरल्याचं पाहायला मिळतंय. आगामी काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. थंडीच्या तडाख्यानं महाराष्ट्रही चांगलाच गारठलाय.

उत्तरेकडून दक्षिणेकडं वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळं वर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीची लाट पसरल्याचं दिसून आलं. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीची थंडी पडल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं मुंबईकरांना सध्या मुंबईतचं माथेरानला गेल्याचा आनंद घेता येत असल्याचं सांगितलं जातंय.

सोमवारी मुंबईत 15.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कुलाब्यामध्ये 18.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी मुंबईचं तापमान हे 15.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर माथेरानमध्येही 15 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये 11 ते 12 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर पश्चिम भारतातील मोठ्या भागात थंडीची लाट पसरली आहे. येत्या तीन दिवसांत उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या वेगळ्या भागांमध्ये पुढील दोन दिवस थंडीची लाट पसरण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, वायव्य भारतातील मैदानी भागात हिमालयातून येणाऱ्या वायव्य वाऱ्यांमुळं येत्या दोन दिवसांत वायव्य आणि लगतच्या मध्य भारतातील किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मंगळवारपर्यंत राजस्थानच्या उत्तर भागात थंडीची लाट ते तीव्र थंडीच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली आणि आसपासच्या परिसरात थंडीच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळाला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube