“मस्कला दुकान बंद करुन पुन्हा आफ्रिकेत जावं लागेल”, ‘त्या’ इशाऱ्यानंतर ट्रम्पही भडकले

“मस्कला दुकान बंद करुन पुन्हा आफ्रिकेत जावं लागेल”, ‘त्या’ इशाऱ्यानंतर ट्रम्पही भडकले

Donald Trump replies Elon Musk : अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या (Donald Trump) अतिमहत्वाकांक्षी One Big, Beautiful Bill या विधेयकावर मतदान घेण्यात येत आहे. या विधेयकासाठी मागील 12 तासांपासून मतदान होत आहे. परंतु, या बिलावर टीकाही प्रचंड होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे एकेकाळचे सल्लागार एलन मस्क (Elon Musk) यांनी या विधेयकावर घणाघाती टीका केली होती. जर सिनेटमध्ये हे विधेयक मंजूर झाले तर दुसऱ्याच दिवशी नवा राजकीय पक्ष स्थापन करू असा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर आता ट्रम्प यांनीही मस्कला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रम्प म्हणाले, मला राष्ट्रपती बनण्यासाठी मदत करण्याच्या आधीच मस्कला माहिती होतं की मी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणाच्या विरोधात आहे. प्रत्येकालाच इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी बाध्य करता येऊ शकत नाही. मस्क यांना मानव इतिहासात कदाचित सर्वाधिक सबसिडी मिळू शकते पण विना सबसिडी त्यांना त्यांचं दुकान बंद करून आफ्रिकेत जावं लागेल. इतक्या प्रमाणात रॉकेट लाँचर, सॅटेलाइट किंवा इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन होणार नाही आणि यात आम्ही भरपूर पैशांची बचत करू.

..तर दुसऱ्याच दिवशी नवा पक्ष स्थापन करणार; ट्रम्पविरोधात मस्क पुन्हा आरपारच्या भूमिकेत

DOGE ने आता मस्क यांना मिळालेले सरकारी अनुदान आणि करारांची पडताळणी करावी आणि यात कपात करावी. यातूनही बरेच पैसे वाचतील असा टोला ट्रम्प यांनी लगावला. खरंतर ट्रम्प यांनी मस्कला हे उत्तर दिलं आहे. याआधी मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली होती. मस्क यांनी या विधेयकावर टीका करताना जर हे मुर्खपणाचं विधेयक सिनेटमध्ये मंजूर झालं तर दुसऱ्याच दिवशी नवा राजकीय पक्ष स्थापन करू असा इशारा दिला होता.

मस्कला ‘त्या’ विधेयकाचा इतका राग का?

एलन मस्क ट्रम्प सरकारच्या वन बिग, ब्यूटीफुल विधेयकाचे कट्टर विरोधक आहेत. या बिलामुळे राष्ट्रीय कर्जात वारेमाप वाढ होईल आणि हा आकडा पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढू शकतो. यामुळे वित्तीय तूट वाढण्याची दाट शक्यता आहे. या बिलामुळे अमेरिकेतील नागरिकांवर अतिरिक्त ताण पडेल. या विधेयकात इलेक्ट्रिक वाहन टॅक्स क्रेडिट आणि स्वच्छ ऊर्जा प्रोत्साहन निधी रद्द करण्याची तरतूद आहे. ही तरतूद मस्क यांची कंपनी टेस्लासाठी घातक आहे.

खरंतर एलन मस्क दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) रहिवासी आहेत. मस्कचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला होता. तसेच आयुष्यातील एक मोठा काळ त्यांनी आफ्रिकेतच घालवला आहे. मस्क 1989 मध्ये 17 वर्षांचे असताना कॅनडात आले होते नंतर अमेरिकेत स्थलांतरीत झाले. मस्कने अमेरिकेतच आपल्या व्यवसायाचा विस्तार केला.

आयफोन निर्मितीसाठी भारतच फायद्याचा ; डोनाल्ड ट्रम्प यांना वृत्तपत्राने कसे तोंडावर पाडले ?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube