ट्रम्प यांच्या धमक्यांकडं दुर्लक्ष; इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांकडून २० लाख डॉलर्स आकारणार

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज १० जहाजांना जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

News Photo   2026 04 12T205236.654

अमेरिका आणि इराण दरम्यान सध्या दोन आठवड्यांचा (War) युद्धविराम झाला आहे. मात्र, अद्यापही होर्मूझच्या समुद्रधुनीतून जहाजांच्या प्रवासासंदर्भात अनिश्चितता कायम आहे. या मार्गावरून जाणाऱ्या काही जहाजांकडून इराम तब्बल २० लाख डॉलर (सुमारे १७ कोटी रुपये) एवढे शुल्क वसूल करत असल्याचं वृत्त आहे. असं असतानाच, भारताने या सागरी मार्गावरून जहाजांच्या स्वतंत्र आणि सुरक्षित वाहतुकीची भूमिका घेतली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज १० जहाजांना जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इराणने प्रत्येक जहाजामागे दोन दशलक्ष डॉलर्स शुल्क निश्चित केले आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज दहा (एक डझनपेक्षा जास्त नाही) जहाजे हटवण्याचाही निर्णय घेतला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इराणचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा अमेरिकेसोबतच्या शस्त्रसंधी वाटाघाटी अनिर्णित राहिल्या आहेत.

शांततेची संधी हुकली! इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण चर्चा अपयशी, युद्ध पुन्हा सुरू होणार?

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक सुपरटँकरसाठी दोन दशलक्ष डॉलर्स शुल्क आकारण्याची योजना आखत आहे. सध्या, अनेक देशांच्या जहाजांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कडे संपर्क साधला आहे.

यासंदर्भात, इराणच्या संसदीय राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलाएद्दीन बोरौजेर्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुज पार करणाऱ्या जहाजांकडून २ दशलक्ष डॉलर ट्रान्झिट शुल्क वसूल करणे ही इराणची शक्ती दर्शवते. २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्रितपणे इराणवर हल्ला केला. तेव्हापासूनच तेल आणि गॅस वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला आहे.

इराणकडून आकारल्या जात असलेल्या या शुल्कासंदर्भात बोलताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, “होर्मुजच्या समुद्रधुनीतून प्रवास करण्याच्या बदल्यात इराणला पैसे देण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास योग्य निर्णय घेतला जाईल.

महत्त्वाचे म्हणजे, इराणने भारताला ‘मित्र देश’ म्हणून या मार्गावरून प्रवासाची परवानगी दिली आहे. आतापर्यंत या मार्गावरून भारताचे ८ एलपीजी टँकर्स सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत. हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भारत आपले ९० टक्के तेल आणि वायू आयातीसाठी मध्यपूर्वेवर अवलंबून आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून अमेरिका-इराणमधील तणाव

अमेरिका-इस्रायल आघाडी आणि इराण यांच्यात सहा आठवड्यांच्या युद्धानंतर, ८ एप्रिल रोजी युद्धविराम जाहीर करण्यात आला. यानंतर, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधी मंडळांनी चर्चा केली. शनिवारी संध्याकाळी सुरू झालेली ही चर्चा २१ तास चालली, परंतु ती अनिर्णित राहिली.

इस्लामाबादमधील इराण-अमेरिका चर्चेच्या अपयशामागे होर्मुझची सामुद्रधुनी हे देखील एक प्रमुख कारण मानले जात आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या या चर्चेत, इराण आणि अमेरिका आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले. अमेरिकेला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करायची होती, परंतु इराणने नकार दिला.

follow us