मालदीवच्या संसदेत फुल्ल ऑन राडा : सत्ताधारी अन् विरोधी भिडले, एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण
माले : भारताविरोधी पवित्रा घेतल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने चर्चेत आलेला मालदीव देश आज (28 जानेवारी) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मालदीवच्या (Maldives) संसदेत आज सत्ताधारी आघाडी आणि विरोधी खासदारांमध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या हाणामारीमुळे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळासाठी सुरु असलेल्या मतदानातही आडकाठी आली. (Maldivian Parliament today saw a fierce clash between the ruling coalition and opposition MPs)
मालदीवमध्ये राष्ट्रपती आणि खासदार यांची निवड वेगवेगळी होती. 2019 मध्ये खासदारांसाठीची निवडणूक पार पडली होती. यात माजी राष्ट्रपती मोहम्मद सोलिह यांच्या नेतृत्वातील मालदीवियन डेमोक्रेटिक पक्षाला बहुमत मिळाले होते. तर गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली होती. यात मोहम्मद मुईज्जू निवडून आले होते. त्यानंतर गतवर्षीच त्यांच्या मंत्रिमंडळासाठी निवडणूक पार पडणार होती. पण संसदेत विरोधी गटाचे बहुमत असल्याने आणि 2024 मध्ये पुन्हा एकदा खासदारकीची निवडणूक पार पडणार असल्याने सत्ताधारी गटाला निवडणूक होऊ द्यायची नव्हती.
ކެނދިކުޅުދޫ ދާއިރާގެ މެމްބަރު އީސާގެ ފައިގައި ހިފައި ކަނޑިތީމު މެމްބަރު ޝަހީމް ވައްޓާލާ މަންޒަރު. އެމްޑީޕީ ދޫކޮށް ޕީއެންސީއާ ގުޅުނު ސަރުކާރުގެ މެމްބަރުން މަޖިލީހަށް ހުރަސް އެޅުމާއެކު ތަޅުމުގައި ހަމަނުޖެހުން އަންނަނީ ހިނގަމުން. pic.twitter.com/mnmzvYKsrO
— Adhadhu (@AdhadhuMV) January 28, 2024
याच कारणामुळे डिसेंबर महिन्यातही सत्ताधारी पिपल्स नॅशनल काँग्रेस आणि प्रोग्रेसिव पार्टी ऑफ मालदीव यांनी मुईज्जूंच्या मंत्र्यांची निवडणूक पुढे ढकलली होती. त्यानंतर आता ही निवडणूक पार पडणार होती. पण याच निवडणुकीदरम्यान, दोन्ही गटांमध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळाला. व्हायरल व्हिडीओमध्ये, एमडीपीचे खासदार इसा आणि पीएनसीचे खासदार अब्दुल्ला शाहीम अब्दुल हकीम एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारताना दिसत आहेत. शाहीम यांनी इसा यांचा पाय पकडला आणि त्यानंतर ते जमिनीवर पडले. त्यानंतर इसा यांनी शाहीम यांच्या मानेवर लाथ मारली आणि त्याचे केस ओढले.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपचा दौरा करून आले. त्यांच्या या दौऱ्याची प्रचंड चर्चा झाली. तसेच या दौऱ्यादरम्यान त्यांनी भारतीय पर्यटन क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न केला. पर्यटकांना भारतीय पर्यटन स्थळ आणि विशेषतः लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केले होते. मात्र याच मुद्द्यावरून भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये वातावरण तापले होते.