चीनचं वॉटर पॉलिटिक्स! भारताची जागा घेत चीनने मालदीवला दिलं पाणी
China Maldives Relation : भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव अजूनही (China Maldives Relation) मिटलेला नाही. त्यामुळे मालदीव आता हळूहळू चीनकडे झुकू लागला आहे. चीननेही या परिस्थितीचा आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेण्याचा इरादा ठेवला आहे. याचे एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. मालदीवमध्ये सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याआधी भारत मालदीवला मदत करत होता परंतु चीनने भारताची जागा घेतली आहे. चीनने मालदीवला दीड हजार टन पाण्याची दुसरी खेप रवाना केली आहे. दोन महिन्यांच्या आत ही दुसरी मदत चीनने मालदीवला केली आहे. हे पाणी तिबेटच्या हिमनद्यांतून मिळालेले आहे.
सन डॉट एमव्ही वृत्तसंसथेच्या रिपोर्टनुसार चीनच्या जिजांग स्वायत्त क्षेत्राने गुरुवारी मालदीवला दीड हजार टन पिण्याचे पाणी मदत म्हणून दिले. हे पाणी मालदीवमधील नागरिकांना ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे त्या ठिकाणी वितरीत करण्यात येणार आहे. याआधी 27 मार्च रोजी मालदीव सरकारने चीनकडून दीड हजार टन पाण्याची खेप मिळाल्याची माहिती दिली होती. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात चीनचे राजदूत वांग लिक्सिन यांनी मालदीवचे विदेश मंत्री मुसा जमीर यांच्याकडे पाण्याची ही खेप सोपवली. चीन मालदीवचा चांगला मित्र आहे. संकटाच्या काळात चीन मालदीवचा सहकारी आहे असे विदेश मंत्र्यांनी यावेळी सांगितले होते.
Maldives Election: मालदीवमध्ये चीन समर्थक मुइझ्झूंचा मोठा विजय! पीएनसीने 93 पैकी 66 जागा जिंकल्या
डिसेंबर 2014 मध्ये येथील एका कंपनीच्या परिसरात लागलेल्या भीषण आगीनंतर मालदीवमध्ये तीव्र पाण्याचे संकट निर्माण झाले होते. या संकटात भारताने मालदीवची मोठी मदत केली होती. यावेळी म्हणजेच 4 डिसेंबर 2014 रोजी भारत सरकारने ऑपरेशन नीर अंतर्गत मालदीवला पाणी उपलब्ध करून दिले होते. परंतु, सध्या दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून दोन्ही देशांतील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. अजूनही कडवटपणा कायम आहे. या वादानंतर चीनने फायदा घेण्याचे ठरवले. चीनने मालदीवला अनेक वेळा मदत केली. आताही पाण्याची मदत केली. याद्वारे चीन भारताची जागा घेऊ पाहत आहे. चीनी राज्यकर्त्यांच्या या प्रयत्नांना मालदीवमधूनही साथ मिळत आहे.
अखेर मालदीवने गुडघे टेकले; टूरिझम अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनची भारताला मदतीची साद