पाकिस्तानात हिंसाचार! जमिनीच्या वादातून थेट गोळीबार, 30 जणांचा मृत्यू; दीडशे जखमी
Pakistan News : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मोठा (Pakistan News) हिंसाचार झाला आहे. येथील उत्तर पश्चिम भागातील जिल्ह्यात जमिनीच्या वादाचे रुपांतर दोन गटांच्या हिंसाचारात झाले. हा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. रविवारी मात्र या वादाने संघर्षाचे रुप धारण केले. दोन्ही बाजूंनी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 30 लोकांचा मृत्यू झाला तर तब्बल 145 लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सैन्याकडून केला जात आहे. सैन्याने या भागाला वेढा दिला आहे. असे असतानाही अधूनमधून गोळीबार होतच आहे. इतकेच नाही तर थेट रॉकेट लाँचरच्या मदतीने हल्ले केले जात आहेत.
Pakistan : पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा चीन दौरा; दोन्ही देशांत नक्की काय शिजतंय?
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान जवळच्या (Afghanistan) खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात तीस लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे काही गटांत तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस आणि सेनेच्या अधिकाऱ्यांनी तसेच येथील स्थानिक नेत्यांनी संघर्ष नियंत्रणात आणला होता. परंतु, जमिनीच्या वाटपावरून दोन्ही गटांत पुन्हा हिंसाचार उफाळला. गोळीबार करण्यात आला.
चार ते पाच दिवसांपूर्वी दोन टोळ्यांत संघर्ष सुरू झाला होता. पीवर, तांगी, बालिशखेल, खार कलाय, मकबल, कुंज अलीजाई, पारा चमकानी आणि कमरन सहीत अन्य भागात हिंसाचार पसरला. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की दोन्ही बाजूंनी मोर्टार गोळे आणि रॉकेट लाँचरसह अत्याधुनिक हत्यारांचा वापर केला जात होता. कुर्रम जिल्ह्यातील पाराचिनार आणि सद्दा या भागात मोर्टार आणि रॉकेट गोळे डागण्यात आले. एक दिवसाआधी कमीत कमी चार वेळा हल्ले झाले. यामध्ये अनेक लोक मारले गेले. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता येथील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
इतिहासातून पाकिस्तानने धडा घेतला नाही आता आम्ही.. PM मोदींचा पाकिस्तानला कठोर इशारा
पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष वाढला
पाकिस्तान सरकार आणि सेना टीटीपी संघटनेच्या कारवायांनी हैराण झाले आहे. यातील हल्लेखोर पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करून अफगाणिस्तानात जाऊन लपतात. पाकिस्तान सरकारने तालिबान सरकारला या हल्लेखोरांना आश्रय देऊ नका असे अनेकवेळा सांगितले होते. मात्र या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे पाकिस्तानने नव्या मोहिमेची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. या संघर्षाला तोंड देत असतानाच पाकिस्तानात अंतर्गत संघर्षही वाढला आहे.