South Korea : धक्कादायक! पत्रकार परिषदेतच विरोधी नेत्यावर चाकूहल्ला; दक्षिण कोरियात काय घडलं?

South Korea : धक्कादायक! पत्रकार परिषदेतच विरोधी नेत्यावर चाकूहल्ला; दक्षिण कोरियात काय घडलं?

South Korea Stabbing : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दक्षिण कोरियातून (South Korea Stabbing) धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण कोरियातील विरोधी पक्षनेते ली जे म्यू्ंग (Lee Jae Myung) यांच्यावर भर पत्रकार परिषदेत चाकू हल्ला करण्यात आला. म्यूंग पत्रकार परिषदेला संबोधित करत असतानाच त्यांच्या गळ्यावर चाकू मारण्यात आला. बुसान या शहरात ही थरारक घटना घडली. या हल्ल्यात म्यूंग जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या योनहॅप या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

हल्लेखोर हा प्रसारमाध्यमांच्या गराड्यात उभा होता. यानंतर त्याला तत्काळ अटक करण्यात आली. या घटनेनंतर वीस मिनिटांनी म्यूंग यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. बुसान येथील कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शहरातील नवीन विमानतळाच्या पाहणीसाठी म्यू्ंग येथे आले होते. यानंतर त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यानंतर ते बेशुद्ध झाले. आता त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.

उत्तर कोरियाने केली नव्या ड्रोनची निर्मिती; पाण्याखाली आणता येणार त्सुनामी

दक्षिण कोरियातील मीडियाने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सागंतिले की हल्लेखोराने ली म्यूंग यांच्यावर हल्ला करण्यासाठी चाकूसारख्या टोकदार वस्तूचा वापर केला. या प्रकाराचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हल्लेखोर म्यूंग यांच्यावर हल्ला करताना दिसत आहे. हल्ला केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच येथे उपस्थित असलेल्या लोकांनी पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केले. या घटनेचे काही फोटोही प्रसारित झाले आहेत. त्यात ली म्यूंग खाली जमिनीवर पडलेले दिसत असून त्यांच्या गळ्याभोवती रुमाल दिसत आहे.

राष्ट्रपती होता होता पराभव झाला 

ली जे म्यूंग दक्षिण कोरियातील डेमोक्रॅटिक पार्टीचे नेतृ्त्व करतात. सध्या ते सदस्य नाहीत. तरीदेखील एप्रिल 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ते उमेदवार असतील अशा चर्चा सुरू आहेत. 2022 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्रपती यू सुक योल यांनी त्यांचा फक्त 0.73 टक्के मतांच्या फरकाने पराभव केला होता. दक्षिण कोरियाच्या इतिहासात ही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरली होती. आता 2027 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ली म्यूंग उभे राहतील अशी शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube