साखरेच्या उत्पादनात भरघोस वाढ, यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज

साखरेच्या उत्पादनात भरघोस वाढ, यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज

नवी दिल्ली : देशात सध्या उसाचा गळीत हंगाम सुरु आहे. हंगाम सुरु असतानाचं एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झालीय. या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशातील साखरेचं उत्पादन 120 लाख टनांवर गेलं आहे. यावरुन देशातील साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचं समजतंय. देशातील विविध राज्यात साखरेचं मोठं उत्पादन झालं आहे. त्यामुळं सध्या साखरेचा विक्रमी साठा झालाय.

विविध पिकांच्या उत्पादनात भारताचा जगातील अव्वल देशांमध्ये वरचा क्रमांक लागतो. सध्या देशात साखरेचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याचे चित्र आहे. चालू ऊस गाळप हंगामाच्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबरची आकडेवारी समोर आली आहे. या तिमाहीमध्ये साखरेचं विक्रमी उत्पादन झालं आहे. देशातील साखरेचे उत्पादन 3.69 टक्क्यांनी वाढून 120.7 लाख टन झाले आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशन अर्थात इस्माने याबाबतची माहिती दिली आहे. भारत हा साखर उत्पादन करणारा जगातील आघाडीवरचा देश आहे. गेल्या वर्षी याच हंगामात 116.4 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यात यंदा वाढ झाली आहे. साखर कारखानदारांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षी 500 साखर कारखान्यांनी उसाचं गाळप केले होते. तर यंदा ते 509 साखर कारखान्यांकडून उसाचं गाळप सुरु आहे.

इंडियन शुगर मिल असोसिएशन अर्थात इस्मानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील साखर उत्पादन 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत 45.8 लाख टनांवरून 46.8 लाख टनांपर्यंत वाढले आहे. उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन 30.09 लाख टनांवर पोहोचले आहे. कर्नाटकातील साखरेचे उत्पादन 26.01 लाख टनांच्या तुलनेत 26.27 लाख टनांवर गेले आहे. गुजरातमध्ये 3.8 लाख टन, तामिळनाडूमध्ये 2.6 लाख टन आणि इतर राज्यांमध्ये 9.9 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. दरम्यान साखरेच्या उत्पादनाची ही आत्तापर्यंतची आकडेवारी आहे. आणखी यामध्ये वाढ होणार आहे. कारण सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरु आहे. पुढचे दोन ते तीन महिने उसाचा गळीत हंगाम सुरु राहणार आहे. त्यामुळं उत्पादनात वाढ होणं अपेक्षीत आहे.

2021-22 च्या तुलनेत 2022-23 मध्ये साखरेचे उत्पादन वाढण्याचा अंदाज इस्मानं वर्तवलाय. 2021-22 मध्ये साखरेचे उत्पादन हे 358 लाख टन झाले होते. आता हे उत्पादन 2022-23 मध्ये 365 लाख टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज इस्मानं व्यक्त केलाय. साखरेच्या चांगल्या उत्पादनाची स्थिती पाहता केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात करेल असा अंदाज आहे. निर्यातीचा कोटाही निश्चित केला जाईल. 2021-22 मध्ये भारतानं विक्रमी 111 लाख टन साखर निर्यात केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube