भारतावर हल्ला झाला तर अमेरिका खंबीरपणे उभी राहणार! मोदींच्या नेतृत्वाचे ट्रम्प यांच्याकडून कौतुक
ट्रम्प यांनी भारताच्या समर्थनार्थ केलेले विधान आणि पंतप्रधान मोदींबाबत व्यक्त केलेले मत सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Trump praises Modi’s leadership : फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जी-7 शिखर परिषदेदरम्यान भारत आणि अमेरिकेच्या संबंधांना नवी बळकटी देणारी महत्त्वाची घडामोड घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत संरक्षण, जागतिक सुरक्षा, पश्चिम आशियातील तणाव आणि आर्थिक सहकार्य यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे, या बैठकीत ट्रम्प यांनी भारताच्या समर्थनार्थ केलेले विधान आणि पंतप्रधान मोदींबाबत व्यक्त केलेले मत सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.
जी-7 शिखर परिषदेदरम्यान झालेल्या मोदी-ट्रम्प भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. जवळपास तासभर चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत अत्यंत सकारात्मक आणि ठाम भूमिका मांडली. चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असताना भारतावर कोणतेही संकट आले किंवा देशावर हल्ला झाला, तर अमेरिका भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. ट्रम्प यांच्या या विधानाला भारतासाठी मोठा राजनैतिक पाठिंबा म्हणून पाहिले जात आहे.
याचवेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचेही तोंडभरून कौतुक केले. मोदी दिसायला अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी असले तरी चर्चेच्या टेबलावर ते अतिशय कठोर आणि प्रभावी भूमिका मांडतात, असे ट्रम्प यांनी सांगितले. मी कदाचित मोदींसारखा शांत नाही, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळी ताकद आहे. ते कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचा मुद्दा अत्यंत स्पष्ट आणि ठाम असतो, अशा शब्दांत ट्रम्प यांनी मोदींचे वर्णन केले. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सातत्याने प्रगती करत असल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले. जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे नेतृत्व करत आहेत, तोपर्यंत भारताची प्रगती थांबणार नाही. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ऑपरेशन टायगरला ब्रेक? खा. संजय दीना पाटील आणि ओमराजे निबाळकरांच्या पत्रावर सह्या नसल्याची माहिती
बैठकीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेचाही उल्लेख झाला. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी सैन्याच्या कारवाईदरम्यान तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेबद्दल ट्रम्प यांनी शोक व्यक्त करत मृत भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अमेरिका आवश्यक ती खबरदारी घेईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनीही जागतिक सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे ट्रम्प यांच्यासमोर मांडले. विशेषतः हॉर्मुझ सामुद्रधुनीतील वाढता तणाव, जहाजांवरील हल्ले आणि त्यामुळे जागतिक व्यापार व ऊर्जा पुरवठ्यावर होणारे परिणाम याकडे त्यांनी लक्ष वेधले. हॉर्मुझमधील कोणतीही नाकाबंदी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकते, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.
पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका करत असलेल्या प्रयत्नांचेही मोदी यांनी स्वागत केले. संघर्षाऐवजी संवाद आणि राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे भारताचे मत त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. यावेळी ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाचाही उल्लेख केला. हे युद्ध शक्य तितक्या लवकर थांबावे, अशी अमेरिकेची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील अनेक संघर्ष कमी करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत आठ वेगवेगळ्या संघर्षांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला.
इराणने अटी मान्य केल्या नाही तर, पुन्हा युद्ध… ट्रम्प यांचा G7 परिषदेतून थेट इशारा
इराणवरही ट्रम्प यांनी जोरदार टीका केली. गेल्या अनेक दशकांपासून इराणने जागतिक व्यवस्थेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, त्याचवेळी पश्चिम आशियात दीर्घकालीन स्थैर्य निर्माण करण्यासाठी सर्व देशांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. जी-7 परिषदेदरम्यान झालेली मोदी-ट्रम्प भेट केवळ औपचारिक बैठक न राहता भारत-अमेरिका संबंधांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे मानले जात आहे. भारताच्या सुरक्षेबाबत अमेरिकेने व्यक्त केलेली ठाम भूमिका, मोदींच्या नेतृत्वाचे ट्रम्प यांनी केलेले कौतुक आणि जागतिक प्रश्नांवर दोन्ही नेत्यांमध्ये झालेली सविस्तर चर्चा यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आगामी काळात संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि जागतिक सुरक्षेच्या क्षेत्रात भारत-अमेरिका सहकार्य आणखी मजबूत होण्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.