दिल्लीत महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान जोरदार राडा

दिल्लीत महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान जोरदार राडा

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी मतदानापूर्वी शपथविधी सुरू होताच गोंधळ उडाला. यावेळी ‘आप’ आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि खुर्च्या देखील फेकझोक झाली. या भांडणात दोन्ही बाजूचे काही नगरसेवक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली महानगरपालिकेच्या नागरी केंद्रात सकाळी नामनिर्देशित नगरसेवकांचा शपथविधी सोहळा सुरू होताच आम आदमी पक्षाच्या (आप) नगरसेवकांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात गोंधळ सुरू केला आणि सीटजवळ घोषणाबाजी सुरू केली.

यावेळी ‘आप’ आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज बराच वेळ थांबवावे लागले. दरम्यान, विनोद कुमार, लक्ष्मण आर्य, सुनीत चौहान आणि मुकेश मान या 10 नामनिर्देशित नगरसेवकांपैकी केवळ 4 जण शपथ घेऊ शकले. सुमारे तासाभरानंतर कामकाज पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला असता, पुन्हा गदारोळ झाला आणि नगरसेवकांमध्ये खुर्च्या फेकझोक झाल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

‘आप’ने महापौरपदासाठी शैली ओबेरॉय यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने रेखा गुप्ता यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीत सहभागी न होण्याचे जाहीर केले आहे. महापौर आणि उपमहापौरांची निवड झाल्यानंतर स्थायी समितीच्या सहा सदस्यांची निवड होणार आहे. उपराज्यपालांनी कॉर्पोरेशन कायद्याच्या कलम 77 अन्वये महापौर निवडीसाठी सभेच्या अध्यक्षतेसाठी नगरसेवक सत्य शर्मा यांची नियुक्ती केली.

दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या 250 जागांच्या महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजपचा 15 वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. 134 जागा मिळाल्या असताना भाजपला केवळ 104 जागा मिळाल्या आहेत, तर निवडणुकीनंतर एक अपक्ष उमेदवार आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये सामील झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube