Explainer : अमेरिकेला का हवंय सेंट मार्टिन बेट? जाणून घ्या, बांग्लादेशच्या सत्तापालटाचं कनेक्शन..

Explainer : अमेरिकेला का हवंय सेंट मार्टिन बेट? जाणून घ्या, बांग्लादेशच्या सत्तापालटाचं कनेक्शन..

Bangladesh Violence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी (Sheikh Hasina) राजीनामा देऊन देश सोडला. सध्या शेख हसीना भारतात आहेत. बांगलादेशात आज जी (Bangladesh Violence) परिस्थिती आहे. त्यासाठी अमेरिकाच जबाबदार आहे असा आरोप शेख हसीना यांनी नुकताच केला आहे. देश सोडण्याआधी त्या देशाला संबोधित करून एक भाषण देणार होत्या. मात्र लष्कराने परवानगी दिली नाही. आता हेच भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शेख हसीना यांनी स्पष्ट सांगितले आहे की जर सेंट मार्टिन बेट (Saint Martin Island) अमेरिकेला दिले असते तर सत्तेतून बेदखल व्हावे लागले नसते. आता हे सेंट मार्टिन बेट नेमकं कुठं आहे? आणि अमेरिकेला या बेटाचा ताबा का हवा आहे? हे जाणून घेऊ या..

सेंट मार्टिन बेट बंगालच्या खाडीत उत्तर पूर्व भागात स्थित आहे. या भागात तीन वर्ग किलोमीटर इतकाच या बेटाचा विस्तार आहे. या बेटाला नारिकेल जिंजिरा या नावाने देखील ओळखले जाते. याचा अर्थ नारळाचं बेट असाही होतो.

सेंट मार्टिन बेटाचा इतिहास

सन 1900 मध्ये सेंट मार्टिन बेट ब्रिटिशांच्या मालकीचे होते. सन 1937 मध्ये जेव्हा म्यानमार (Myanmar) ब्रिटिश इंडियापासून वेगळा झाला तेव्हाही हे बेट भारताचाच हिस्सा राहिले. भारताची फाळणी होऊन पाकिस्तान नावाचा (Pakistan) नवा देश अस्तित्वात आल्यानंतर हे बेट पाकिस्तानच्या अधिपत्याखाली गेले. त्यावेळी आजचा बांगलादेश पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता. पुढे 1971 मध्ये पाकिस्तानपासून अलग होऊन बांगलादेश अस्तित्वात आला त्यावेळी सेंट मार्टिन बेट बांगलादेशला मिळाले.

Bangladesh violence: बांग्लादेशमधील राजकीय अस्थिरता हिंदुंच्या जीवावर; मंदिरांची तोडफोड, जाळपोळ

सन 1974 मध्ये या बेटावरून बांगलादेश आणि म्यानमारमध्ये एक करार झाला. ज्यामध्ये या बेटाला बांगलादेशचा हिस्सा मानण्यात आले. या करारानंतरही म्यानमारने या बेटावरील आपला दावा सोडला नाही. पुढे हे प्रकरण समुद्री कायद्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाकडे गेले होते. यानंतर 2012 मध्ये न्यायाधिकरणाने या बेटाला बांगलादेशचाच हिस्सा मानले. तरी देखील म्यानमार या बेटाला आपला भाग मानत आहे.

नैसर्गिक संपत्तीने भरलेले सेंट मार्टिन बेट पर्यटकांसाठी नेहमीच पहिले प्राधान्य ठरले आहे. येथील स्थानिक नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्नही या माध्यमातून मिटतो. या भागात तीन हजारांपेक्षा जास्त लोक राहतात. मासेमारी हा बहुतांश लोकांचा रोजगार आहे. सेंट मार्टिन बेट नैसर्गिक सौंदर्याने भरलेले असून येथे दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

सेंट मार्टिनवर अमेरिकेचा डोळा

जगातील सर्वात व्यस्त समुद्री व्यापार मार्गांपैकी एक मलक्का जलडमरू मध्य मार्गाजवळ हे बेट आहे. या बेटावर जर सैनिक तळ निर्माण केले तर बंगालच्या खाडीत कोणत्याही देशाची ताकद वाढणार आहे. अमेरिका या बेटावर आपल्या सैनिकांना तैनात करू इच्छितो असे सांगितले जात आहे. जर असे घडले तर बंगालच्या खाडीतही अमेरिकेचा दबदबा वाढणार आहे.

बांग्लादेशातील हिंसाचारात कुणाचा हात? शेख हसीनांच्या मुलाचा खळबळजनक दावा

शेख हसीना यांनी याआधीही सांगितलं आहे की अमेरिकेचा या बेटावर डोळा आहे. जून महिन्यात शेख हसीना यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की या बेटावर अमेरिका आपला अधिकार जमविण्याचा प्रयत्न करत आहे. इतकेच नाही तर यासाठी बांगलादेशातील निवडणुकीत (Bangladesh Elections) शेख हसीना यांना विजयी करण्याचे आश्वासन देखील अमेरिकेने दिले आहे. परंतु शेख हसीना यांनी सेंट मार्टिन बेट अमेरिकेला देण्यास नकार दिला होता. अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी मात्र शेख हसीना यांचा हा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळला होता. तसेच बांग्लादेशातील सत्तापालटात आमची कोणतीही भूमिका नाही अशी ताजी प्रतिक्रिया अमेरिकेनी दिली आहे. जगातील महत्त्वाच्या समुद्री मार्गांजवळ सेंट मार्टिन बेट असल्याने अमेरिके प्रमाणेच चीन (China) सुद्धा या बेटासाठी प्रयत्नात आहे.

दरम्यान, आता बांग्लादेशात आता जे सरकार अस्तित्वात आलं आहे. त्यातील अनेक जण अमेरिका समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आगामी काळातील बांग्लादेशच्या वाटचालीत अमेरिकेचा प्रभाव आणि हस्तक्षेपही दिसून आल्यास आश्चर्य वाटायला नको. नजीकच्या भविष्यात सेंट मार्टिन बेटाबाबत काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube