भ्रष्टाचार केला तर सुट्टी नाहीच, 10 वर्षांत तब्बल 50 लाख लोकांना शिक्षा; चीनमध्ये काय घडतंय?

भ्रष्टाचार केला तर सुट्टी नाहीच, 10 वर्षांत तब्बल 50 लाख लोकांना शिक्षा; चीनमध्ये काय घडतंय?

China News : भ्रष्टाचाराची वाळवी सगळीकडेच लागली आहे. जगभरात आपलीच मक्तेदारी निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेला चीन सुद्धा (China News) याला अपवाद नाही. चीनमध्ये वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 2012 पासूनच देशात भ्रष्टाचार विरोधी अभियान (Anti Corruption Campaign) राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लाखो कारवाया झाल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून चीनच्या संरक्षण मंत्र्यांची चौकशी नुकतीच सुरू झाली आहे. दुसरीकडे बँक ऑफ चायनाचे (Bank of China) माजी अध्यक्ष लियू लियांग यांना भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर पद्धतीने कर्ज वाटपाच्या आरोपांवरून मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

चीन जगभरात एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून ओळखला जातो. तसेच भ्रष्टाचार विरोधात कठोर भूमिकेमुळे सुद्धा या देशाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. येथे एखाद्याने भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाल्यास त्याला एकतर मृत्युदंड दिला जातो किंवा आयुष्यभर कारावासाची शिक्षा सुनावली जाते. शिक्षेत कुणालाही सोडले जात नाही म्हणजे सरकारमधील एखादा वजनदार मंत्री असला किंवा एखादा अब्जाधीश असला तरी येथील कायद्याच्या कचाट्यातून कुणीही सुटू शकत नाही.

आता तुम्ही विचार करत असाल की शी जिनपिंग यांचं (Xi Jinping) हे भ्रष्टाचार विरोधी अभियान थांबणार तरी कधी? तर याच सरळ उत्तर असं आहे की कदाचित कधीच नाही. कारण मागील दशकभरात तब्बल 50 लाख लोकांविरुद्ध कारवाई झाली आहे आणि अजूनही मोठ्या प्रमाणात कारवाईच सत्र सुरूच आहे.

Russia China : चीन-रशियाकडून डॉलर हद्दपार! द्विपक्षीय व्यापारासाठी तयार केला खास प्लॅन

भ्रष्टाचाराशी संबंधित दोन मोठ्या बातम्या नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. चीनचे रक्षा मंत्री विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू झाली आहे. डोंग जुंग तिसरे संरक्षण मंत्री आहेत ज्यांच्या विरुद्ध अशा प्रकारची चौकशी सुरू झाली आहे. दुसरी बातमी तर यापेक्षाही जास्त धक्कादायक आहे. बँक ऑफ चायनाचे माजी चेअरमन लियू लियांग यांना भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर पद्धतीने कर्ज वाटपाच्या आरोपांवरून मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

चीनच्या पिपुल्स लिबरेशन आर्मीमध्ये (PLA) उच्च पदांवर बसलेले लोक भ्रष्टाचारात लिप्त असल्याचे सांगितले जाते. रक्षा मंत्री डोंग जूंग भ्रष्टाचाराच्या आरोपांत अडकले आहेत. रिपोर्ट्सनुसार भ्रष्टाचारामुळे सैन्य अधिक कमकुवत होत आहे अशी भीती चीनला वाटत आहे. त्यामुळे 2023 पासून चिनी सैन्यात अँटी करप्शन ड्राईव्ह राबवण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत 9 पीएलए जनरल आणि अनेक अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे.

लियू यांच्याबद्दल बोलायचं झालं तर न्यायालयाने त्यांना 168 कोटी रुपयांची लाच घेण्याच्या आरोपात दोषी मानलं आहे. या व्यतिरिक्त त्यांनी 4620 कोटी रुपयांचे बेकायदेशीर कर्ज अशा कंपन्यांना दिले आहे ज्या या कर्जासाठी पात्र नव्हत्या. यानंतर लियू यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांना सर्व राजनितिक अधिकारांपासून वंचित करण्यात आलं आहे. तसेच त्यांनी बेकायदेशीर मार्गाने जितकी कमाई केली आहे ती देखील सरकारजमा करण्यात आली आहे.

China : चीनचा नवा जीएसआय उद्योग, पाकिस्तानची चांदी; भारताला मात्र धोक्याची घंटा

2012 पासून सुरू आहे अभियान

नोव्हेंबर 2012 मध्ये शी जिनपिंग कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (Communist Party of China) म्हणजेच सीसीपीचे जनरल सेक्रेटरी म्हणून निवडले गेले होते. तेव्हापासूनच जिनपिंग यांनी भ्रष्टाचारा विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यानंतर जेव्हा मार्च 2013 मध्ये जिनपिंग राष्ट्राध्यक्ष झाले त्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी अँटी करप्शन कॅम्पेन लाँच केले. या अभियानांतर्गत आतापर्यंत 50 लाख अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या अधिकाऱ्यांप्रमाणेच कनिष्ठ प्रवर्गातील कर्मचारी देखील या अभियानात नेहमीच रडारवर असतात.

चीनच्या या अभियानात पारदर्शकपणा आणि उत्तरदायित्वाचा अभाव असल्याने यावर प्रचंड टीका देखील होत असते. अन्य देशांत अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी स्वतंत्र विभाग आहेत. येथे कोणत्याही पक्षाचा कोणताही हस्तक्षेप नसतो. परंतु चीनमध्ये असे काहीच नाही. येथे भ्रष्टाचाराशी संबंधित नियम आणि कायदे चीनची कम्युनिस्ट पार्टीच निश्चित करते. कठोर अंमलबजावणी देखील केली जाते. जाणकारांच्या मते स्वंतत्र तपास आणि संतुलनाचा अभाव याचा अर्थ राजकीय प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या तपासाचा मुद्दा पुढे केला जाऊ शकतो. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर या अभियानाच्या आडून जिनपिंग यांना अजेय बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube