पाकिस्तानातील नौदल तळावर मोठा हल्ला; चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

पाकिस्तानातील नौदल तळावर मोठा हल्ला; चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

Pakistan News : पाकिस्तानचा अशांत प्रांत बलुचिस्तानमधून पुन्हा धक्कादायक (Pakistan News) बातमी समोर आली आहे. येथील दुसऱ्या क्रमांकाच्या नौदलाच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला आहे. तुर्बत शहरातील पाकिस्तानी नौदल स्टेशनवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. ऑटोमॅटिक शस्त्रे आणि ग्रेनेडने सज्ज असलेल्या दहशतवाद्यांनी तुर्बतमधील पाकिस्तानी नौदल स्टेशनवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दल आणि या अतिरेक्यांत चकमक सुरू झाली. या हल्ल्यात सुरक्षा दलांचे कोणतेही नुकसान झाले नाही.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी या नौदल स्थानकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु, येथे सुरक्षा दलाचे जवान तैनात होते. त्यांनी दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. गोळीबारात चार दहशतवादी ठार झाले. यानंतर सुरक्षा दलाने या परिसराची नाकाबंदी केली. नौदलाच्या या तळावर चीनी ड्रोनही तैनात आहेत.

Pakistan News : पाकिस्तानात इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज; अनेकांना अटक

काही सूत्रांकडून असा दावा केला जात आहे की या हल्ल्यात सहा दहशतवाद्यांचा सहभाग होता. यातील चार जण ठार झाले दोघे मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले. परंतु, या माहितीची खात्री अजून झालेली नाही. पाकिस्तानी लष्करी मीडिया शाखा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याची माहिती आहे. संघटनेच्या आत्मघाती तुकडी माजीद ब्रिगेच्या सैनिकांनी हा हल्ला केल्याचे बीएलएने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अलीकडच्या काळात पाकिस्तानातील लष्करी तळांवर मोठे हल्ले होत आहेत. याआधी 20 मार्च रोजी आठ अतिरेक्यांनी ग्वादरमध्ये एक इमारतीवर हल्ला केला होता. यामध्ये दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला होता. यानंतर दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात सर्व दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. यानंतरही सातत्याने हल्ले होत आहेत. यावरून पाकिस्तानात सध्या काय परिस्थिती आहे याचा अंदाज येतो.

Pakistan News : पाकिस्तानातील ग्वादर बंदरावर मोठा हल्ला; आठ दहशतवाद्यांचा खात्मा

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचा सातत्याने विरोध केला जात आहे. बलुचिस्तानचे लोक पाकिस्तानातून बाहेर पडून स्वतंत्र देशाची मागणी करत आहेत. परंतु, पाकिस्तानी राज्यकर्ते येथील नागरिकांवर दडपशाही करत असतात. या भागात नैसर्गिक संपत्ती मुबलक प्रमाणात आहे. चीनने याच (China) भागात मोठी गुंतवणूक केली आहे. तसेच पाकिस्तानच्या गरजा या भागातूनच पूर्ण केल्या  जातात. त्यामुळे पाकिस्तान आणि बलुचिस्तानातील संघटना यांच्यात कायमच संघर्ष सुरू असतो.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज