‘दोन शब्द’चे आगळेवेगळे प्रकाशन; विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरूच्या पुस्तकाचे लोकार्पण
स्वतःच्या पुस्तक प्रकाशनासाठी नामवंत व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित न करता आपल्या विद्यार्थ्यांनाच पाहुणे म्हणून आमंत्रित केले.
‘Don Shabda’ Literary Essay Collection Launched by Students : अहिल्यानगर : एपिग्राम प्रकाशन (Epigram Books) , मुंबईच्या माध्यमातून डॉ. स्मिता देशपांडे भुसे (Dr. Smita Deshpande-Bhuse) यांच्या ‘दोन शब्द’ (Don shabd) या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. स्वतःच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी नामवंत व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याऐवजी आपल्या विद्यार्थ्यांनाच प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा अनोखा उपक्रम डॉ. भुसे यांनी केला. त्यामुळे हा प्रकाशन सोहळा केवळ पुस्तक प्रकाशन न राहता शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचा आणि ऋणानुबंधाचा सुंदर सोहळा ठरला.
विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचा सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी घेण्यास विरोध; नेमकं कारण काय?
डॉ. स्मिता देशपांडे भुसे या हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करतात. अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी केवळ शैक्षणिक नाते न ठेवता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी, भावविश्वाशी आणि जीवनप्रवासाशी जोडले जाणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेला हा जिव्हाळा त्यांच्या लेखनातूनही सातत्याने व्यक्त होत असतो.
फेसबुक या सोशल मीडीया माध्यमावर त्या ‘समाधानाची फुले’ या लेखमालिकेतून आपल्या विद्यार्थ्यांविषयी आवर्जून लिहित आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक पैलू, त्यांचे कर्तृत्व, त्यांच्या वाटचालीतील संघर्ष आणि यश यांची दखल घेणाऱ्या या लेखमालिकेची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या यशाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा हा प्रयत्न शिक्षक-विद्यार्थी नात्याला एका वेगळ्याच उंचीवर नेणारा ठरत आहे.
खासदारांची मोदी भेट, जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र प्रवास; राज्यात नव्या राजकीय चर्चांना उधाण
याच भावनेतून ‘दोन शब्द’ या ललित लेखसंग्रहाच्या प्रकाशनाचा निर्णयही त्यांनी घेतला. पुस्तक प्रकाशनाच्या पारंपरिक पद्धतीला छेद देत त्यांनी आपल्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या विद्यार्थ्यांनाच या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे केले. त्यामुळे आपल्या गुरूच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा मान विद्यार्थ्यांना मिळाला आणि शिक्षकाने विद्यार्थ्यांवर ठेवलेला विश्वास, प्रेम व अभिमान याची अनोखी अनुभूती या प्रसंगी उपस्थितांना आली.
या प्रसंगी बोलताना डॉ. स्मिता देशपांडे भुसे म्हणाल्या, “माझे विद्यार्थी हेच माझे संजीवन आहेत. आयुष्यात जेव्हा जेव्हा आता नोकरीमधून निवृत्त व्हावे असे वाटले, तेव्हा जून महिन्यात नव्याने आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामधील मराठी विषयावरील प्रेम हेच माझ्यासाठी वरदान ठरले आहे. म्हणून आज माझ्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात मला विशेष आनंद होत आहे.”
त्यांच्या या भावपूर्ण मनोगतातून विद्यार्थ्यांबद्दल असलेला आत्मीयतेचा भाव प्रकर्षाने जाणवला. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देणे एवढेच आपले कर्तव्य नसून त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीत त्यांच्यासोबत उभे राहणे, त्यांच्या गुणांचे कौतुक करणे आणि त्यांच्या यशाचा आनंद स्वतःच्या यशाप्रमाणे साजरा करणे, हीच खरी गुरू-शिष्य परंपरा असल्याचा संदेश या प्रकाशन सोहळ्यातून देण्यात आला.
या आगळ्यावेगळ्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. स्मिता देशपांडे भुसे यांच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय वाटचालीचेही दर्शन घडले. मानसोपचारतज्ज्ञ सुकन्या फणसाळकर, आर.जे. प्रसन्न पाठक, बालनाट्यभूमीतील रंगकर्मी तेजा पाठक, जिओ स्टारचे असिस्टंट मॅनेजर विराज मुनोत, प्रसिद्ध उद्योगपती अमित गरुड, राज ऑप्टिकलचे किरण महाजन, सिद्धार्थ एंटरप्राईजेसचे संकेत होशींग, शासकीय अधिकारी अजिंक्य सोनवणे, अभिनेता तेजस अतितकर, प्राध्यापक ऋतुजा कुलकर्णी आणि तेजस पवार हे विद्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नाटक करणाऱ्यांचा तमाशा कसा करायचा, हे गणेश नाईकला माहीत; एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा
विशेष म्हणजे डॉ. भुसे यांच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर विविध क्षेत्रांत आपापले स्वतंत्र स्थान निर्माण केले असून, आपल्या गुरूच्या साहित्यकृतीच्या प्रकाशनासाठी ते एकत्र आले. त्यामुळे हा क्षण त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील आठवणींना उजाळा देणारा आणि गुरू-शिष्य नात्याचा स्नेह अधिक दृढ करणारा ठरला. या प्रकाशन सोहळ्यास प्राध्यापक अतुल कुलकर्णी, प्राध्यापक अर्चना कुलकर्णी, प्राध्यापक अपर्णा शेपाळ, प्राध्यापक जयश्री पवार, डॉ. रत्ना वाघमारे, डॉ. दया भोर जेठे, डॉ. सुरेखा साळवे यांच्यासह साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिका कर्मचारी धीरज परदेशीचा उपचारादरम्यान मृत्यू, पोलिसांकडून काही संशयित आरोपींना अटक
पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या विद्यार्थ्यांनाच केंद्रस्थानी ठेवण्याची डॉ. स्मिता देशपांडे भुसे यांची कल्पना उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरली. शिक्षकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रेम, विश्वास आणि यश, हा विचार या सोहळ्यातून अधोरेखित झाला. त्यामुळे ‘दोन शब्द’ हे पुस्तक जितके साहित्यिक अभिव्यक्तीचे माध्यम आहे, तितकाच त्याचा प्रकाशन सोहळा हा शिक्षक-विद्यार्थी नात्याच्या संवेदनशील आणि अतूट बंधाचा प्रेरणादायी दस्तऐवज ठरला.