दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा, पंचनामे उद्यापासून सुरू
Drought Update : पावसानं पाठ फिरवल्यानं राज्यावर दुष्काळाचं सावट गडद झालं असतानाच, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे उद्यापासुन पंचनामे.
राज्यात पावसानं पाठ फिरवल्यानं (Drought) खरीप हंगाम अडचणीत आला असुन शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. पिकांचं नुकसान झाल्यानं आता शेतकऱ्यांचं लक्ष सरकारच्या मदतीकडं लागलं आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हालचालींना वेग दिला असुन उद्यापासुन तालुका स्तरावर पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवसांत दुष्काळाची अधिसुचना जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देताना पंचनामे तातडीनं पुर्ण करण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री आणि आपण स्वतः अमरावती, अकोला विभागात जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेच्या मंत्र्यांनाही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नुकसान समोर आल्यानंतर मदत देण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवली जाईल, असं शिंदे यांनी सांगितलं.
मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; 8 जिल्ह्यांत पावसाची किती तूट?, वाचा आकडेवारी
बळीराजा हा अन्नदाता असुन सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार त्याचा असल्याचं शिंदे यांनी नमुद केलं. अतिवृष्टी आणि गारपीटीच्या संकटात सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली असुन मागील वर्षीही संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी उभं राहिल्याचं त्यांनी सांगितलं. एनडीआरएफच्या निकषांपेक्षा पुढं जाऊन महायुती सरकारनं मदत केल्याचा दावाही त्यांनी केला. यंदा शेतकऱ्यांची दसरा आणि दिवाळी काळी होऊ देणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
दरम्यान, राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसल्यानं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50,000 मदत द्यावी आणि त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी विरोधकांकडुन करण्यात आली आहे. त्यानंतर सरकारनं पंचनाम्याचे आदेश दिले असुन उद्यापासुन प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होणार आहे. पंचनाम्यांच्या अहवालानंतर मदतीबाबत निर्णय घेतला जाणार असुन येत्या तीन दिवसांत दुष्काळाची अधिसुचना निघण्याची शक्यता आहे.