Mutual Fund Investment Tips : गुंतवणुकीत लवचिकता असलीच पाहिजे. यामुळे बाजाराची स्थिती आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार बदल करता येईल. याच कारणामुळे अनेक गुंतवणूकदार मुच्युआल फंड स्विच (Mutual Fund) करण्याचा पर्याय निवडत असतात. पण फंड बदलणे प्रत्येक वेळी बरोबर असते का, या प्रश्नाचे उत्तर गुंतवणुकीची (Investment Tips) गरज आणि मार्केटच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
म्युचुअल फंड स्विचिंगचा अर्थ म्हणजे तुम्ही एका स्कीममधून पैसे काढून दुसऱ्या स्कीममध्ये गुंतवणूक करणे. ही प्रक्रिया एकाच फंड हाऊसच्याच अंतर्गत किंवा वेगवेगळ्या फंड हाऊसदरम्यान होऊ शकते. अनेक गुंतवणूकदार नियमित प्लॅनमधून डायरेक्ट प्लॅनमध्ये देखील स्विच करतात. जेणेकरून एजेंटला कमिशन द्यावे लागणार नाही. तसेच चांगला परतावा मिळेल.
वेळेनुसार मार्केटमध्ये चढ उतार सुरू असतात. जर एखाद्या गुंतवणुकदराचा इक्विटी फंड (Equity Fund) खूप जास्त वाढला असेल आणि त्याला सुरक्षित गुंतवणूकीची गरज भासत असेल तर तो डेट फंडमध्ये स्विच करू शकतो. अशाच पद्धतीने एखादा गुंतवणूकदार जास्त परतावा घेऊ इच्छित असेल तर तो कमी जोखमीच्या फंडातून इक्विटी फंडात स्विच करू शकतो. या व्यतिरिक्त खराब कामगिरी करणाऱ्या फंडातून चांगल्या फंडात जाण्यासाठी देखील स्विच करता येऊ शकेल.
स्विचिंग करण्याआधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही सर्व प्रक्रिया मोफत नाही. काही फंडात एक्झीट लोड द्यावा लागतो. जो साधारणपणे 1 टक्का असू शकतो. या व्यतिरिक्त जर तुम्ही इक्विटी फंड एक वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी होल्ड केला असेल तर तुम्हाला 15 टक्क्यांचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल.
जर तुमचा मूच्युअल फंड सातत्याने खराब कामगिरी करत असेल किंवा तुमच्या गुंतवणुकीच्या गरजा बदलल्या असतील तर स्विचींग एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण जर फक्त मार्केट मधील चढ उतार पाहून तुम्ही सातत्याने फंड बदलत असाल तर नुकसानही होऊ शकते. फंड स्विच करण्याचा निर्णय नेहमी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करून घेतला पाहिजे.