अमेरिकेचा भारताला मोठा धक्का! अमेरिकन ट्रेड टीमचा भारत दौरा रद्द; व्यापार करार अधांतरी

India US Trade Deal : अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लादला. त्यानंतर आता आणखी मोठा धक्का ट्रम्प प्रशासनाने दिला आहे. अमेरिकेने प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या सहाव्या टप्प्यातील बैठक रद्द केली आहे. ही बैठक 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीत होणार होती. आता हा दौरा रिशेड्यूल केला जाईल अशी माहिती एका अमेरिकी अधिकाऱ्याने दिली.
डोनाल्ड ट्रम्प टीमचे पाच दौरे
भारत आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड डील संदर्भात आतापर्यंत पाच टप्प्यांतील चर्चा पूर्ण झाली आहे. सहाव्या टप्प्यातील चर्चा दिल्लीत होणार होती. परंतु, आता ही बैठक स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे. ही बैठक स्थगित होणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. कारण अमेरिकेने भारतावर जो अतिरिक्त 25 टक्क्यांचा टॅरिफ आकारला आहे त्याची अंमलबजावणी येत्या 27 ऑगस्टपासून होणार आहे.
रशिया-युक्रेन युद्धविरामात युरोपीय आयोगाची आडकाठी; डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगणार?
कृषी आणि डेअरी क्षेत्रावर दबाव
भारतातील कृषी आणि डेअरी क्षेत्रात आधिकाधिक व्यापार करण्याची अमेरिकेची इच्छा आहे. परंतु, आम्ही शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही हे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. भारत कृषीप्रधान देश आहे. अशात जर अमेरिकी बाजार भारताच्या कृषी बाजारात दाखल झाला तर यातून मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागू शकते.
अमेरिका आणि भारत अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात व्यापार करत आहेत. आता द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याची योजना तयार करण्यात आली आहे. सध्या दोन्ही देशांत 191 अब्ज डॉलर्सचा (16750.88 अब्ज भारतीय रुपये) व्यापार होत आहे.
अमेरिका भारत व्यापारात वाढ
अमेरिकेने सुरुवातीला भारतावर 25 टक्के टॅरिफ आकारला होता. त्याची अंमलबजावणी 7 ऑगस्टपासूनच सुरू झाली आहे. यानंतर ट्रम्प यांनी आणखी 25 टक्के टॅरिफची घोषणा केली होती. हा टॅरिफ येत्या 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल-जुलै 2025 दरम्यान भारताकडून अमेरिकेला होणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्यातीत 21.64 टक्के वाढ झाली. तर आयातीत 12.33 टक्क्यांची वाढ झाली. या काळात अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार देश ठरला.
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये तब्बल तीन तास बैठक, भारताची दिली पहिली प्रतिक्रिया