मधुमेहाने डोळेही होतील खराब! मधुमेहामुळे डोळ्यांना होणारे गंभीर आजार कोणते? लक्षणे, उपायही जाणून घ्या

diabetes causes eye diseases symptoms of eyes diseases and ways to prevent it : देशात मधुमेहाचे रुग्ण सातत्याने वाढतच आहेत. मधुमेह ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरात साखरेची (ग्लुकोजची) पातळी सामान्य पातळीपेक्षा जास्त होते. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत, टाइप 1 आणि टाइप 2. मधुमेहाच्या टाइप 1 मध्ये शरीर इन्सुलिन तयार करू शकत नाही, तर टाइप 2 मध्ये शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणाचे मुख्य कारण म्हणजे सातत्याने जंक फूड खाणे, ताणतणाव, शारीरिक हालचालींचा अभाव आणि अनुवांशिकता. वेळेवर काळजी न घेतल्यास, त्याचा परिणाम केवळ शरीराच्या उर्जेवर आणि वजनावरच होत नाही तर डोळे, मूत्रपिंड आणि हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांनाही होऊ शकतो.
पर्वतांच्या कुशीत सुरू होणार ‘मना’चे श्लोक’ चा प्रवास; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
मधुमेहासारखा गंभीर आजार फक्त शरीरातील साखरेवरच परिणाम करत नाही तर तुमच्या डोळ्यांचे आरोग्यही धोक्यात आणतो. मधुमेह शरीराच्या रक्तप्रवाहावर आणि नसांवर परिणाम करतो आणि डोळ्यांमध्ये असलेल्या लहान नसांनाही नुकसान पोहोचवू शकतो. दीर्घकाळापर्यंत साखरेची पातळी जास्त राहिल्यास डोळ्यांच्या नसांमध्ये सूज आणि स्त्राव होऊ शकतो. यामुळे रेटिनावर दबाव वाढतो आणि दृष्टी कमकुवत होण्याचा धोका वाढतो. मधुमेहामुळे डोळ्यांमध्ये मोतीबिंदू, काचबिंदू आणि रेटिनोपॅथी सारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, नियमित डोळ्यांची तपासणी करणे खूप महत्वाचे आहे.
मधुमेहाचा डोळ्यांवरती होणारा परिणाम
मधुमेह डोळ्यांवरती अनेक पद्धतीने परिणाम करतो. सुरुवातीला अंधुक दृष्टी, प्रकाशात झलक किंवा चमक येणे आणि जवळच्या किंवा दूरच्या गोष्टी स्पष्टपणे न दिसणे हे सामान्य आहे. हळूहळू, जेव्हा रेटिनावर परिणाम होतो तेव्हा दृष्टी कमी होऊ शकते आणि रंग ओळखण्यात अडचण येऊ शकते. काही लोकांना अचानक डोळ्यांसमोर डाग किंवा तरंगणारे काळे डाग दिसू लागतात. याशिवाय, डोळ्यांची जळजळ, लालसरपणा, कोरडेपणा किंवा डोळे वारंवार मिचकावणे यांसारख्या समस्या देखील दिसू शकतात. जर वेळेवर उपचार केले नाहीत तर यामुळे गंभीर डोळ्यांचे आजार किंवा अंधत्व देखील येऊ शकते.
डोळ्यांची काळजी कशी घ्याल?
वेळोवेळी रक्तातील साखरेची पातळी तपासा. कमी गोड आणि कमी तेलकट अन्नपदार्थ घ्या. दररोज व्यायाम करा आणि योगा करा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. वर्षातून किमान एकदा तरी डोळ्यांची संपूर्ण तपासणी करा. दृष्टीमध्ये कोणताही बदल दिसल्यास किंवा वेगळी काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.