सावधान! प्रदूषणामुळे होतोय डोळ्यांचा ‘हा’ आजार; काळजी घ्या, डोळ्यांचं आरोग्य जपा
Dry Eye Syndrome due to Air Pollution : देशाची राजधानी दिल्ली एनसीआरसह (Delhi) अन्य राज्यांत प्रदूषणाची समस्या (Air Pollution) वेगाने वाढत चालली आहे. प्रदूषण अत्यंत घातक पातळीवर पोहोचलं आहे. थंडीची चाहूल लागताच उत्तर भारतातील काही राज्यांत उसाचे पाचट जाळण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. आता दिवाळी तोंडावर (Diwali 2024) आली आहे. या काळातही फटाक्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दिल्ली शाहराचाच विचार केला तर येथे AQI 300 च्या पुढे गेला आहे. प्रदूषणाची ही एक अत्यंत गंभीर स्थिती मानली जाते. यामुळे लोकांना श्वसनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.
प्रौढ व्यक्तींपासून लहान मुलांपर्यंत सर्वच यामुळे प्रभावित होतात. प्रदूषणामुळे यंदा लोकांमध्ये ड्राय आय सिंड्रोम (Dry Eye Syndrome) समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रदूषणामुळे लोकांना ही समस्या भेडसावत आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हा विकार आधी लहान मुलांमध्येच दिसून येत होता पण आता युवक आणि प्रौढ व्यक्तींमध्ये देखील हा आजार वाढीस लागला आहे. यामध्ये प्रदूषणाची समस्या तर आहेच. शिवाय मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनचा (Screen Time) अत्याधिक वापर तसेच दीर्घकाळ एसीमध्ये राहणे यांचाही समावेश आहे.
बापरे! 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुले लठ्ठपणाच्या आहारी; जाणून घ्या, वाढत्या आजाराची कारणे
काय आहे ड्राय आय सिंड्रोम
या विकारात डोळे कोरडे होतात. डोळ्यांत पुरेशा प्रमाणात अश्रू तयार होत नाही. यामुळे डोळे लाल होणे, डोळ्यांत जळजळ होणे आणि डोळ्यांत धुसरपणा येतो. जास्त वेळ स्क्रीन पाहिल्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले जात असले तरी वाढते प्रदूषण आणि शहरांतील खराब हवा हे देखील कारणीभूत ठरू लागल्याचे दिसून येत आहे.
वेगाने वाढतोय ड्राय आय सिंड्रोम
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी फक्त काही मुलांमध्येच ही समस्या दिसून येत होती. २०१९ पर्यंत ही समस्या दुप्पट झाली होती. २०२४ पर्यंत मात्र या समस्येत वेगाने वाढ होत असल्याचे दिसून आले. जास्त वेळ मोबाईल पाहणे हे देखील एक मोठे कारण मानले जात आहे. लहान मुले तासनतास मोबाईल पाहत असतात. यामुळे ड्राय आय सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो. आताच हा विकार नियंत्रणात आणला नाही तर आगामी काळात यामध्ये मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
प्रदूषणामुळे धोका आणखी वाढला
वेगाने वाढणाऱ्या हवेच्या प्रदूषणाने या समस्येत भर घालण्याचे काम केले आहे. प्रदूषणामुळे लोकांचे डोळे लाल होत आहेत. डोळ्यांची जळजळ ही होत आहे. तसेच बंद खोलीत दीर्घकाळ एसीमध्ये राहिल्याने सुद्धा या समस्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वातानुकूलित यंत्रणा (एसी) असणाऱ्या घरात दीर्घकाळ राहिल्याने डोळे कोरडे होतात त्यातील ओलावा नाहीसा होतो. यामुळे सुद्धा ड्राय आय सिंड्रोम वाढत आहे.
पाच, दहा की वीस..किती वेळा धुवावेत हात? हेल्दी आरोग्यासाठी किती आवश्यक, जाणून घ्या खास माहिती
कसे कराल संरक्षण
ड्राय आय सिंड्रोम पासून संरक्षण करायचे असेल तर २०-२०-२० हा फॉर्म्युला लगेच अमलात आणणे सुरू करा. तुम्ही कॉम्प्युटरवर काम करत असाल तर दर २० मिनिटांनंतर २० सेकंदांसाठी २० फूट दूर असणाऱ्या एखाद्या वस्तूकडे पहा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. तसेच डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करण्याचे प्रमाण वाढते. असे केल्याने डोळ्यांतील ओलावा कायम राहतो.
याशिवाय स्वतः नेहमी हायड्रेट राहा. जास्तीत जास्त पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घ्या.
प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे देखील त्रासदायक ठरू शकतं. तेव्हा दिवसातून किती पाणी पिले पाहिजे हे तुमच्या डॉक्टरांकडून माहिती करून घ्या.
मोबाईल किंवा टीव्ही पाहत असाल तर मधूनमधून ब्रेक घेत चला. रात्री पुरेशी झोप घ्या. झोपण्याआधी जास्त वेळ मोबाईल पाहू नका.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एखादा चांगला आय ड्रॉप देखील वापरू शकता.