आयफोन खरेदी करताय मग, जास्त पैसे मोजा; ट्रम्प यांच्या टॅरिफचा होणार इफेक्ट!

Apple iPhone : अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील (Donald Trump) देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ आकारण्यास सुरुवात (Reciprocal Tariff) केली आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर आता अमेरिका 26 टक्के टॅरिफ वसूल करणार आहे. भारताकडून अमेरिकेच्या वस्तूंवर जवळपास 52 टक्के टॅरिफ आकारला जातो. ट्रम्प सरकारच्या या निर्णयाचा फटका इलेक्ट्रॉनिक वस्तूंना नक्कीच बसणार आहे. यामुळे भारतात आयफोन महागण्याची (Apple iPhone) चिन्हे दिसू लागली आहे. आयफोनच्या किमती वाढणार हे नक्की पण किती वाढणार याबाबत माहिती घेऊ या..
खरंतर अॅपल कंपनी बहुतांश आयफोनचे उत्पादन चीनमध्ये करते. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 34 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. जर हा कर लागू राहिला तर आयफोनची किंमत 30 ते 40 टक्क्यांनी वाढू शकते. जर कंपनीने किमती वाढविल्या नाहीत तर उत्पादनाचा जास्त खर्च कंपनीलाच उचलावा लागेल. पण असे काही होईल याची शक्यता कमीच आहे.
रॉयटर्स नुसार iPhone 16 बेस वेरिएंट किंमत अमेरिकेत 799 डॉलर इतकी आहे. यामध्ये 43 टक्के वाढीचा अंदाज आहे. जर असे घडले तर आयफोनच्या किमती 1142 डॉलर पर्यंत पोहोचू शकतात. iPhone 16 Pro Max ची किंमत 1599 डॉलर्स वरून 2300 डॉलरपर्यंत वाढू शकते.
ट्रम्प यांच्या टॅरिफचे गोल्ड मार्केटला हादरे; एक तोळा सोन्याचे दर 91 हजार पार..
Apple च्या अडचणी वाढणार
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लावले होते. त्यावेळी त्यांनी Apple कंपनीला थोडा दिलासा दिला होता. पण यावेळी मात्र ट्रम्प सवलत देण्याच्या मूडमध्ये नाहीत. अशात कंपनीला एकतर फोनच्या किंमती वाढवाव्या लागतील किंवा स्वतः लाच खर्च उचलावा लागेल.
Counterpoint Research नुसार Apple कंपनीला सरासरी 30 टक्के दरवाढ करावी लागणार आहे. जेणेकरून वाढलेल्या टॅरिफची भरपाई करता येईल. CFRA रिसर्चच्या विश्लेषक अँजेलो जिनो यांच्या मते सध्या आयफोनच्या विक्रीत घट दिसून येत आहे. अशात वाढलेल्या टॅरिफचा सगळाच भार ग्राहकांवर टाकला जाईल असे वाटत नाही. कदाचित 5 ते 10 टक्क्यांपर्यंतचा भार ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो.
PPF मध्ये गुंतवणुक करताय? मग, 5 एप्रिल लक्षात ठेवाच; जाणून घ्या नफ्याचं सोप्पं गणित..
तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की कंपनी आपल्या आगामी iPhone 17 या फोनला वाढीव किमतीसह लाँच करू शकते. मागील काही दिवसांपासून आयफोनच्या विक्रीत घट होत आहे. कंपनी आपल्या एआय फिचर्स Apple Intelligence ग्राहकांना नव्या डिव्हाईसवर स्विच करण्यात अपयशी ठरली आहे. अशात जर कंपनीने फोनच्या किंमतीत वाढ केली तर आयफोनची मागणी आणखी कमी होऊ शकते.