विक्रम काळे, बसवराज पाटील अन् परदेशी नक्कीच नाहीत… घरातूनच मिळणार निंबाळकरांना टफ फाईट

विक्रम काळे, बसवराज पाटील अन् परदेशी नक्कीच नाहीत… घरातूनच मिळणार निंबाळकरांना टफ फाईट

धाराशिवची जागा कोणाकडे जाणार? कोण लढणार? ओमराजेंसारख्या (Omraje Nimbalkar) तगड्या उमेदवाराला, ठाकरेंच्या या वाघाला कोण भिडणार? अशा प्रश्नांची उत्तरे अखेरीस मिळाली आहेत. अनेक दिग्गजांचे आणि बड्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत राष्ट्रवादीकडून एका नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील (Archana Patil) या आता राष्ट्रवादीकडून (NCP) उमेदवार असणार आहेत. शिरुर पॅटर्नप्रमाणे अर्चना पाटील यांचाही पक्षप्रवेश होणार आहे. यापूर्वी निंबाळकर यांच्याविरोधात भाजपकडून आणि राष्ट्रवादीकडूनही वेगवेगळ्या नावांची चर्चा होती. पण या सगळ्यांची नावे मागे पडली आहेत. (Archana-patil-the-former-vice-president-of-dharashiv-zilla-parishad-will-be-the-ncp-candidate-from-parbhani)

नेमके काय घडले पडद्यामागे? कोणती नावे आणि का मागे पडली, घरातूनच निंबाळकर यांना टफ फाईट कशी मिळणार.. पाहुया या ..

सुरुवातीला धाराशिव मतदारसंघ कोणाकडे असणार याबाबतच अनेक चर्चा होत्या. आधी शिंदे गटाकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड इच्छुक होते. पण त्यांची ताकद मर्यादित स्वरुपाची झाल्यामुळे पहिल्या टप्प्यातच त्यांचे नाव मागे पडले. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हेही आपला पुतण्या धनंजय सावंत यांच्यासाठी इच्छुक होते. पण मतदारसंघ आपल्याकडे घ्यायचा आणि सावंतांच्या घराला कशाला मोठे करायचे, याच इराद्याने चर्चेसाठी बसलेल्या भाजप आणि अजितदादांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. त्यामुळे सावंत हेही बैठकीतून चिडून निघून गेले.

शिंदेंकडे उमेदवार नसल्याने ही जागा भाजपकडे जाणार असल्याचे बोलले गेले. आमदार राणाजगजितसिंह पाटील हे उमेदवार असू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली. परंतु आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे सांगत त्यांनी आपले नाव मागे घेतले.  त्यानंतर माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे भाजपचे उमेदवार असू शकतात, असे बोलले जाऊ लागले. स्वतः परदेशींनीही तयारी सुरु केली होती. राज्य शासनाच्या सेवेतून त्यांनी राजीनामाही दिला. भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या, स्थानिक पातळीवर तयारी सुरु झाली. परदेशींच्या भाजप प्रवेशाचा मुहुर्तही ठरला.

मी वाट पाहतोय! महादेव जानकरांसाठी मोदींचा खास संदेश; फडणवीसांनी जाहीर सभेतच सांगितला

1993 मध्ये लातूर भुकंपामध्ये परदेशी यांनी बचावकार्याचे मोठे काम केले होते. त्यामुळे त्यांना या भागात हिरो मानले जाते. त्यामुळे आपली उमेदवारी फायदेशीर होईल असा त्यांचा दावा होता.  पण ओमराजेंसारख्या तगड्या उमेदवाराला ते फाईट देऊ शकतात का? याच्याच चर्चा अधिक झाल्या. मागील पाच वर्षांच्या काळात राजेनिंबाळकरांनी मतदारसंघातील संपर्क आणि वावर यामुळे स्वतःचा एक वेगळा प्रभाव निर्माण केला आहे. ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले आहे. परिणामी परदेशींचे नाव मागे पडले.

त्यादरम्यान, माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेस कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ते भाजपचे उमेदवार असू शकतात, असे बोलले जाऊ लागले. पाटील यांनाही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले. लिंगायत समाजाच्या मतांच्या जोरावर आपण निवडून येऊ शकतो, असा त्यांचा दावा होता. पण भाजपमध्ये प्रवेश करताच पाटील यांच्या विठ्ठलसाई कारखान्याला शासनाकडून 100 कोटी रुपयांची कर्ज हमी मिळाली. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश हा लोकसभेसाठी होता या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

नामदेव जाधव, म्हणतात मला शिवाजी महाराजांचा दृष्टांत झालाय… बारामती लोकसभा लढणार

त्यानंतर आश्चर्यकारकरित्या जागा गेली राष्ट्रवादी काँग्रेसकडे. धाराशिवमध्ये सध्या राष्ट्रवादीचा एखादा मोठा चेहरा नाही. तरीही अजितदादांनी जागा आपल्या पारड्यात पाडून घेतली. धाराशिवमध्ये राणाजगजितसिंह वगळता भाजपकडेही बडा चेहरा नाही. अशात आगामी विधानसभा निवडणूक, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका आणि मतदारसंघातील काही स्थानिक गणिते लक्षात घेऊन पुन्हा चर्चा राणाजगजितसिंहाजवळ येऊन थांबली. अखेरीस त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

मतदारसंघात राणाजगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर या एकाच घरातील दोन कुटुंबियांमधील संघर्ष जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला नवीन नाही. 2007 पासूनच्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुरु झालेल्या या संघर्षाला आता अधिकची धार येणार आहे. त्यामुळेच दीर विरुद्ध भावजय अशा होणाऱ्या या लढतीत कोण विजयी होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज