अडचणीच्या काळात साथ देणारा ‘माधव’ पॅटर्न : भाजपचा हुकमी एक्का पुन्हा चर्चेत…

अडचणीच्या काळात साथ देणारा ‘माधव’ पॅटर्न : भाजपचा हुकमी एक्का पुन्हा चर्चेत…

पंकजा मुंडे, महादेव जानकर अन् छगन भुजबळ… भाजपच्या (BJP) सुप्रसिद्ध अशा माधव (Madhav) पॅटर्नचे प्रमुख तीन चेहरे. यातील पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि जानकरांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मिळणार आहे. 2019 मध्ये भाजपने ‘माधव’ पॅटर्नला फारसे महत्व दिले नव्हते. यंदा मात्र भाजपने पुन्हा एकदा माधव पॅटर्नला सिरीयस घेतले आहे. याला कारणेही तशीच आहे. पण या निमित्तने भाजपने आपला हा हुकमी एक्का पुन्हा डावात आणला आहे हे नक्की. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा पॅटर्न नेमका होता तरी काय आणि यंदा या पॅटर्नच्या जोरावर भाजपला डाव जिंकता येणार का? पाहुयात… (BJP has nominated Pankaja Munde, Mahadev Jankar and Chhagan Bhujbal under the Madhav pattern.)

काँग्रेस मराठा समाजाचा अन् कारखानदारांचा तर भाजप शेटजी-भटजींचा पक्ष. 1980 च्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख दोन पक्षांची काहीशी अशीच ओळख तयार झाली होती. यात जातीय समीकरणांचा अभाव होता. काँग्रेस आणि भाजपमध्येही मागासवर्गीय, दलित समाजातील नेते होते. पण त्यांना विशेषत्वाने जातीचे नेते म्हणून ओळख नव्हती. हीच गोष्ट भाजपने हेरली अन् जन्माला आला भाजपचा हक्काचा माधव पॅटर्न. शेटजी – भटजींचा पक्ष ही ओळख जाऊन पक्षाला व्यापक जनाधार मिळावा म्हणून वसंतराव भागवत यांनी माळी-धनगर-वंजारी (माधव) हा फॉर्मुल्या पुढे आला. यातूनच ओबीसी राजकारणाचा उदय झाला.

Parbhani Loksabha : ‘वंचित’कडून फेरबदल! परभणीत दिला तगडा उमेदवार

पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सगळेच नेते मराठा समाजातील, साखर कारखानदार आणि सरंजमदार होते. सगळेच काँग्रेसचे दरबारी राजकारणी. इथे भाजपने हात-पाय पसरले नव्हते. त्यामुळे भाजपने माधव पॅटर्न उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आग्रहाने राबवला. मंडल आयोगानंतर तर ओबीसी राजकारणाची दिशाच बदलली आणि माधव पॅटर्नला अधिक वेग आला. वंजारी समाजातील गोपीनाथ मुंडे, लेवा पाटील समाजातील एकनाथ खडसे, कुणबी समाजातील भाऊसाहेब फुंडकर असे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आले. भागवतांनी यांना नेतृत्व म्हणून उभे केले. पक्षानेही आलटून-पालटून या पैकीच प्रदेशाध्यक्ष झाले.

गोपीनाथ मुंडे राज्यात उपमुख्यमंत्री झाले, खासदार झाले. भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा झाले. खडसेंनाही बडी खाती मिळाली. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पद देण्यात आले. पुढे 2014 ला पुन्हा मंत्री झाले. भाऊसाहेब फुंडकरही विधानसभेवर, विधान परिषदेवर आमदार झाले. अकोल्यातून खासदार झाले. राज्यात मंत्री झाले. हे तीनच नेते 2014 पर्यंत भाजपमध्ये ओबीसींचे नेते म्हणून ओळखले जात होते. प्रमोद महाजन हे शेटजी-भटजींचे नेते आणि गोपीनाथ मुंडे ओबीसींचे नेते असे समीकरण महाराष्ट्रात तयार झाले होते. अशात धनगर समाजाचा चेहरा म्हणून 2014 च्या निवडणुकीपूर्वी मुंडेंनी महादेव जानकरांनाही सोबत घेतले. त्यांना बारामतीमधून लोकसभेची उमेदवारी दिली.

पुढे 2014 मध्ये गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला. पांडुरंड फुंडकर मंत्री होते, पण सक्रिय नव्हते. परिणामी भाजपचे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे नेतृत्व पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्याकडे आले. पण 2015 मध्ये खडसेंचा मंत्रिमंडळातून राजीनामा झाला. तर पंकजा मुंडेंकडील खाती काढून घेत त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले गेले. 2019 मध्ये महादेव जानकरांनाही लोकसभेला उमेदवारी दिली नाही. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी नेत्यांची तिकीटे कापण्यात आली. पंकजा मुंडे आणि राम शिंदे यांचा पराभव झाला.

Government Schemes : मधुमक्षिका पालन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

या सगळ्यामुळे भाजपमध्ये ओबीसी चेहऱ्याची पोकळी तयार झाली होती. गत पाच वर्षांत भाजपने यातील प्रत्येक गोष्ट दुरुस्त केली. राम शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊन प्रतिनिधित्व दिले. चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद दिले. या दरम्यान, महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण आंदोलनाने उचल खाल्ली. यात मराठा समाजाची बाजू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावून धरल्याचे दिसून आले. तर भाजपने आपला ओबीसी मतदार लक्षात घेत ओबीसींची बाजू घेतली. आता बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. महादेव जानकरांनाही सोबत घेत उमेदवारी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांनाही उमेदवारी देण्याचा निर्णय घेत माधव पॅटर्न पुन्हा डावात आणला आहे.

महाराष्ट्रात सरासरी 40 टक्के ओबीसी समाजाची लोकसंख्या आहे. यातील 34 टक्के तरी मतदार आहेत. एका सर्वेक्षणात 34 टक्क्यांपैकी 2014 मध्ये 22 टक्के आणि 2019 मध्ये 26 टक्के ओबीसी समाजाने भाजपला मतदान केले असावे असा अंदाज वर्तविण्यात आला होता. काही ज्येष्ठ पत्रकारांच्या मते याच मतदानामुळे 2014 आणि 2019 मध्ये भाजपने बंपर विजय मिळविला होता. आता भाजपने पुन्हा आपला माधव पॅटर्न आणून ओबीसी समाजाची मते आपल्याकडेच सुरक्षित राहतील याची काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपलाही आपण यंदा लोकसभेचा डाव जिंकू शकतो याचा पूर्ण आत्मविश्वास असल्याचे दिसून येते आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज