गवळीसाठी भाजपच्या पायघड्या… तुरुंगातील सुटका मुंबईत गेमचेंजर ठरणार?
निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो की कोणत्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेची. भाजपसाठी (BJP) एक एक जागा किती महत्वाची असते, त्या जागेवर विजय मिळविण्यासाठी भाजप ग्राऊंड लेव्हलला जाऊन काय काय करु शकते या गोष्टींचा अनुभव आपल्याला यापूर्वी अनेकदा आलेला आहे. असाच अनुभव आता दक्षिण मुंबईच्या जागेसाठी येत आहे. सेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आपल्याकडे घेत भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना मैदानात उतरवण्याचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने भाजपने इथली जुळवाजुळव सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपने तुरुंगातून बाहेर येत असलेल्या कुख्यात गुंड अरुण गवळीला (Arun Gawali) पायघड्या घातल्या आहेत. अगदी त्याची बहीण आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांना महापौर करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे सेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. (BJP has roped in notorious gangster Arun Gawali, who is coming out of jail.)
नेमके कसे पाहुया…
नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या 2007 मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपावरून अरुण गवळीसह इतर 11 जणांना 2012 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. चौदा वर्षे शिक्षा भोगली असून 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका करावी, अशा मागणीची याचिका गवळीने केली होती. 2006 च्या माफी धोरणानुसार चौदा वर्षे प्रत्यक्ष कारावास भोगलेल्या, वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याची तरतूद आहे. 2015 च्या सुधारित धोरणानुसार त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र 2006 च्या धोरणाचा लाभ घेण्यापासून गवळीला वंचित ठेवता येणार नाही, असे मत न्यायालयाने मांडले होते. त्यानुसार आता अरुण गवळी येत्या काही दिवसात तुरुंगातून बाहेर येणार आहे.
एकनाथ शिंदेंचे मंत्री संदीपान भुमरेही कोट्याधीश; चार वर्षांत भरघोस संपत्ती वाढली!
लोकसभेच्या धामधुमीत या घडामोडी घडत असल्याने याचा राजकीय संबंधही नाकारता येत नाही. त्याबाबत नंतर कधी तरी चर्चा होईलच. पण सध्या न्यायालयच्या आदेशनाचे गवळी बाहेर येत असल्याने त्याचा सुटकेचा लाभ घेण्यासाठी भाजपनेही फिल्डिंग लावली आहे. नार्वेकरांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत थेट गवळी कुटुंबालाच साकडे घातले. “मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रेम मिळेल. या परिवारात एक सदस्य आलाय, असं समजा. या बहिणीला अर्थात गीता गवळी यांना महापौर होईपर्यंत या भावाची साथ राहील”, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले. यातून नार्वेकरांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने साखर पेरणी केल्याची चर्चा सुरु आहे.
खरंतर एकेकाळी अरुण गवळीचे शिवसेनेशी चांगले संबंध होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर जाहीरपणे ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’ असे म्हटले होते. पण 1995 मध्ये शिवसेनेचे सरकार असतानाही न झालेली सुटका आणि अमरावती तुरुंगात केलेली रवानगी यावरुन गवळीचे शिवसेनेसोबत फाटल. त्याने थेट शिवसेनेपासून फारकत घेत मुंबईत सेनेलाच आव्हान देत स्वतःचा अखिल भारतीय सेना पक्ष स्थापन केला. 2004 च्या लोकसभेला मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अरुण गवळी उभा होता, त्यावेळी त्याला 92 हजार 210 मते मिळाली. सेनेच्या मोहन रावळेंचा अवघ्या 22 हजार मतांनी विजय झाला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचपोकळी मतदारसंघातून अरुण गवळीने विजय मिळवला होता. त्याला 31 हजार 964मते मिळाली होती. 2009 च्या निवडणुकीत गवळीचा काँग्रेसच्या मधू चव्हाण यांच्याकडून पराभव झाला.
अजित पवारांवर बोलावं इतकी आपली पात्रता नाही, उमेश पाटलांनी घेतला जानकरांचा समाचार
या दरम्यान, 2007 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्याने कन्या गीता गवळीसह त्याची वहिनी वंदना गवळी आणि कार्यकर्ता सुनील घाटे महापालिका निवडणुकीत विजयी झाले. पुढे अरुण गवळी तुरुंगात गेल्यानंतर गीता गवळींची शिवसेनेशी पुन्हा जवळीक वाढली. थेट ‘मातोश्री’ बंगल्याशी त्यांचा संपर्क असायचा. 2012 मध्येही शिवसेनेने गीता गवळींविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यावेळीही त्यांचा दुसऱ्यांदा विजय झाला. निवडून आल्यानंतर गीता गवळी यांनीही महापौरपदासाठी सेनेला पाठींबा दिला होता. गीता गवळी यांच्याशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्याकडे होती.
त्याशिवाय 2014 मध्ये भायखळा विधानसभा मतदारसंघातही गीता गवळी निवडणूक लढवत असताना शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. पण त्या निवडणुकीत गीता गवळींचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला. 2017 मध्ये महापालिका निवडणूक स्वबळावर मैदानात उतरल्यानंतर शिवसेनेने पहिल्यांदा गवळींविरोधात अधिकृत उमेदवार दिला होता.पण तरीही गीता गवळींचा विजय झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेशी पुन्हा चर्चा सुरु केली. मात्र उद्धव ठाकरेंनी भेट न दिल्याने त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. आता राहुल नार्वेकरांच्या वक्तव्याने गीता गवळी आणि भाजपची जवळीक जाहीररीत्या समोर आली आहे.
अरुण गवळी यांची ताकद असलेला भायखळा मतदारसंघ नार्वेकर ज्या दक्षिण मुंबईमधून इच्छुक आहेत त्याच लोकसभा मतदारसंघात येतो. सध्या भायखळ्यामधून शिवसेनेच्या यामिनी जाधव आमदार आहेत. त्यांच्या आणि गवळींच्या मदतीने इथून नार्वेकरांना मताधिक्य मिळण्याची आशा आहे. लालबाग, परळ, माझगाव, करी रोड, सात रस्ता, नागपाडा या भागात आजही गवळीची ताकद असल्याचे सांगितले जाते. याचा आता भाजपला कसा फायदा होतो हे येत्या निकालात दिसून येईलच.