उदयनराजेंनी राष्ट्रवादीकडून सातारा खेचून कसा घेतला? त्याचीच ही Inside Story
शिरवळच्या नीरा नदीपासून सुरु होणारी सातारा जिल्ह्याची हद्द… हजारोंची गर्दीकरुन दुतर्फा उभे लोक… जेसीबीतून पुष्पवृष्टी… ढोल-ताशा अन् सनईच्या गजरात छत्रपती उदयनराजे भोसले यांची झालेली ग्रँड एन्ट्री… राजेंसाठी असलेलाल हा जल्लोष, त्यांचे झालेले शाही स्वागत अन् हा सत्कार या सगळ्या गोष्टी त्यांच्या विजयी मिरवणुकीसाठी होत्या. हा विजय काही लोकसभा निवडणुकीचा नव्हता. हा विजय होता थेट दिल्लीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेलेले साताऱ्याचे तिकीट परत आणल्याचा…
सातारा जिल्हा म्हणजे आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. आधी यशवंतराव चव्हाण आणि नंतर शरद पवार (Sharad Pawar) यांना मानणाऱ्या या जिल्ह्यात आताच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमधून अजित पवार (Ajit Pawar) यांचा उमेदवार असेल असे जवळपास निश्चित होते. तशा घडामोडीही घडत होत्या. मात्र मागच्या दहा दिवसांपासून उदयनराजेंनी जोर लावला, थेट दिल्ली गाठली अन् आता राजे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. नेमके त्यांनी दिल्लीत असे काय केले? अमित शाह यांना त्यांनी काय सांगितले? पडद्यामागे असे काय घडले, की राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेली साताऱ्याची जागा उदयनराजे भोसले यांनी अक्षरशः खेचून आणली. (Udayanraje Bhosle will contest the Lok Sabha elections on the lotus symbol of BJP.)
उदयनराजे भोसले यांनी तिकीट खेचून आणण्यासाठी काय केले?
पहिला मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेला सुसंवाद :
उदयनराजे आणि फडणवीस यांच्यात पहिल्यापासूनच सुसंवाद दिसून आला. 2019 मध्ये उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर खासदार झाले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचा आग्रह केला. उदयनराजे यांनी या आग्रहाला बळी पडत खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपचे कमळ हाती घेतले. लोकसभेला पराभव होताच त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. त्यानंतर मागच्या पाच वर्षांमध्ये वेळोवेळी राजे आणि फडणवीस यांच्यात अनेक प्रसंगांमध्ये, जाहीर कार्यक्रमांमध्ये जवळीक पाहायला मिळाली.
विजय शिवतारे यांचे बंड शमले : अजितदादा यांच्या शेजारी उभे राहून खळखळून हसले
फडणवीस हे 15 दिवसांपूर्वी साताऱ्यात होते. त्यावेळी ते आवर्जून उदयनराजे यांच्या जलमंदिर या महालात गेले. तेथे त्यांचे जोरदार स्वागत झाले. उदयनराजे आणि फडणवीस यांच्यात वेगळी केमिस्ट्री आहे. ती यावेळीही दिसून आली. फडणवीस यांनी उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांचेही आशीर्वादही घेतले. त्याचवेळी उदयनराजे हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे वातावरण निर्माण झाले. फडणवीस यांनी त्यानंतर सातारा जिल्ह्यातील अनेक विकासकामांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. महायुतीचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते या कार्यक्रमांना उपस्थित होते. या सुसंवादामुळे फडणवीस यांनीही राजेंसाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले.
थेट दिल्लीत केलेल्या हालचाली :
साताऱ्याच्या जागेवर तिन्ही पक्षांचा दावा होता. पण पहिला दावा होता तो राष्ट्रवादीचा. अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच सातारा, बारामती, शिरुर आणि रायगड या राष्ट्रवादीच लढेल असे जाहीर केले होते. शिवसेनेने अनपेक्षितरित्या या मतदारसंघावर दावा केला. जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले. जाधव यांनी या आधीच्या काही निवडणुकांत उदयनराजे यांना चांगली टक्कर दिली होती. महायुतीतील हे दोन पक्षच साताऱ्यासाठी आग्रही असताना भाजपमधून उदयनराजे यांनीही आपल्याला निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांच्या या इच्छेत जागावाटपाचा अडसर होता.
हा मुद्दा राज्यात नाही तर दिल्लीतच सुटू शकतो याची खात्री पटल्याने राजेंनी फडणवीस यांच्याशी चर्चा करुन थेट दिल्ली गाठली. तीन दिवस दिल्लीत थांबलेल्या राजेंची चौथ्या दिवशी फडणवीस यांच्याशी भेट झाली. त्यानंतर ते दोघेही अमित शाहंसोबत चर्चेसाठी गेले. याचवेळी उदयनराजे यांनी काही मुद्दे शाहंच्या निदर्शनास आणून दिले. ते आपण पुढे बघणारच आहोत, पण हे मुद्दे शाहंनाही पटले. फडणवीसही सोबत असल्याने शाहंना या मुद्द्यांची तीव्रता लक्षात आली. त्यानंतर अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यात उदयनराजे यांच्याकडे असेलली राज्यसभेची खासदारकी अजित पवार यांना देण्याचे ठरले. स्वतः अजितदादांनी पुण्यात बोलताना राज्यसभा देणार असल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले.
उदयनराजे आणि फडणवीस यांनी अमित शाहंना काय सांगितले?
कोणताही दावा करताना तो का करतो आहे? त्यामागे काय तर्क आहे, हे समोरच्या व्यक्तीला पटवून द्यावे लागते. त्यात देवेंद्र फडणवीस वाकबगार आहेत. साताऱ्याची जागा आपल्यासाठी आणि भाजपसाठी कशी महत्वाची आहे ही गोष्ट उदयनराजे यांनी आधी फडणवीस यांना समजावून सांगितले. त्यानंतर दोघांनी ही गोष्ट अमित शाहंसमोर मांडली.
यात पहिला मुद्दा होता तो शाहू महाराजांना दिलेली उमेदवारी. महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातून महाविकास आघाडीने कोल्हापूरच्या गादीला मान दिला आहे. आता महायुतीनेही साताऱ्याच्या गादीला मान देऊन राज्यभरात योग्य तो संदेश दिला गेला पाहिजे. अन्यथा यातून भाजपबद्दलच नकारात्मक संदेश जाऊ शकतो.
एकनिष्ठा कुठंवर ठेवायची? मी लढणारच! ठाकरेंना इशारा देत करंजकरांकडून बंडखोरीची संकेत
दुसरी गोष्ट राजेंनी सांगितली ती मराठा समाजाच्या नाराजीबद्दल. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि त्यानंतर त्यांची झालेली कथित फसवणूक यामुळे राज्यातील मराठा समाज नाराज आहे. मराठा आरक्षण कायद्याचेही महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित असलेले जनमत तयार झालेले नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या चेहऱ्यालाच भाजपने डावलले तर त्यातून मराठा समाज आणखी नाराज होऊ शकतो. जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण 2016 मध्ये संभाजीराजे छत्रपती आणि 2019 मध्ये उदयनराजे भोसले यांना भाजपसोबत आणले होते, तो उद्देश आता उदयनराजे यांना तिकीट देऊन पूर्ण होऊ शकतो. संभाजीराजेही आता महाविकास आघाडीसोबत असल्याने निवडणुकीच्या मुख्य प्रवाहाता एक तरी राजघराणे सोबत पाहिजेच, असा फडणवीस यांचा आग्रह होता.
तिसरा मुद्दा म्हणजे 2019 मधील पराभवाच्या परफेडीचा. 2019 मधील पराभव उदयनराजे यांना अजून डसतो आहे. त्यांना या पराभवाची परतफेड करण्याची इच्छा आहे. इथल्या उमेदवाराला पराभूत करुन जनतेतून पुन्हा निवडून जाण्याची त्यांची तयारी आहे. त्यातून जनमत अजूनही साताऱ्याच्या घराण्यासोबत आहे, साताऱ्याच्या गादीचा गेलेला हरवलेला दरारा, रुबाब पुन्हा येऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. पण त्यांच्या या इच्छेमध्ये नवीन राजकीय सोयरिक आडवी येत होती. चौथा मुद्दा राजे आणि फडणवीस यांनी समजावून सांगितला तो भविष्याचा. आजपर्यंत सातारा जिल्ह्याने शरद पवार म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण याप्रमाणे काम केले. आता इथून अजित पवार यांचा उमेदवार निवडून गेला तर ही रेष ते पुढे ओढणार. त्यांचे वर्चस्व संपुष्टात आणायचे असले तर ही जागा भाजपने लढवली पाहिजे, असे मुद्दे मांडले.
अमित शाह यांनाही हे मुद्दे पटले. त्यांनी उदयनराजे यांना ग्रीन सिग्नल दिला अन् त्यांचा पाच दिवसांचा दिल्ली दौरा सुफळ संपूर्ण झाला. या यशस्वी दौऱ्याची वार्ता साताऱ्यात पोहचताच कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करुन उदयनराजेंच्या जंगी स्वागताची तयारी सुरु केली. राजे दिल्लीहून पुण्याला आले अन् काल साताऱ्यात पोहचले. त्यानंतर जो त्यांचा जलवा पाहायला मिळाला लोकसभेच्या विजयापेक्षा कमी नव्हता…