एकनिष्ठा कुठंवर ठेवायची? मी लढणारच! ठाकरेंना इशारा देत करंजकरांकडून बंडखोरीची संकेत
नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांचे नाव चर्चेत असतानाच काल (27 मार्च) अचानक सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता करंजकर नाराज असून त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. निवडणूक लढणार म्हणजे लढणारच अन् विरोधकाला पाडणारही, अशी घोषणा त्यांनी दिली आहे. (Vijay Karanjkar is upset after the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party announced the candidature of Rajabhau Vaje from the Nashik Lok Sabha constituency.)
माध्यमांशी बोलताना करंजकर म्हणाले, गेली 13 वर्षे मी जिल्हाप्रमुख होतो. याकाळात पक्ष वाढवला, जिल्हा परिषद, महानगरपालिका, आमदार, खासदार यांच्यासाठी प्रयत्न केले. 2014 आणि 2019 या दोन्ही वेळी मी इच्छुक होतो. पण पक्षप्रमुखांनी मला थांबायला सांगितले. पण मागील वर्षभरापूर्वीच मला उद्धव ठाकरे यांनी तयारीचे आदेश दिले होते. ते स्वतः देखील सातत्याने तयारीचा आढावा घेत होते. जानेवारी महिन्यातील अधिवेशनापूर्वीही आमची तयारीबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी तिथे संजय राऊतही उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात भाजपला मिळाले ‘बॉस’ : UP मधील बाहुबली नेते नवे इन’चार्ज
असे असताना कालपर्यंत 100 टक्के माझे नाव चर्चेत होते. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सात ते आठ सर्व्हे झाले आहेत. मी स्वतःही सर्व्हे केला आहे. या सगळ्यात करंजकर याच नावाला पसंती होती. मात्र अचानक वाजे यांना तिकीट जाहीर झाले आहे. आता मी दोन दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. मी एकनिष्ठ आहे, पण एकनिष्ठा कुठेपर्यंत ठेवायची असा प्रश्न आता कार्यकर्ते विचारत आहेत.
करंजकर गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सिन्नर आणि इगतपुरी, तसेच शहरभरात प्रचारार्थ पोहचले आहेत. संजय राऊत यांनी देखील विजय करंजकर हेच महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील, असे अनेकदा जाहीर केले होते. यापार्श्वभूमीवर आता मी निवडणूक लढणार म्हणजे लढणारच व पाडणारही, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र प्रतिस्पर्धी कोण, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. मात्र निवडणुकीला शंभर टक्के उभे राहणार, असे त्यांनी सांगितले आहे. यावरून करंजकर हे बंडखोरी करणार असल्याचे स्पष्ट होते.
विजय शिवतारे यांचे बंड शमले : अजितदादा यांच्या शेजारी उभे राहून खळखळून हसले
योगेश घोलप सोबतीला :
नाराज झालेले करंजकर माध्यमांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांच्यासोबत देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप हेदेखील होते. काही महिन्यांपूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव जवळपास झाल्यानंतर माजी मंत्री बबन घोलप यांनी पदाचा राजीनामा दिला. घोलप यांच्या बाबतीत जसे घडले, तीच स्थिती विजय करंजकर यांच्याबाबतीत घडून आल्याने माजी आमदार योगेश घोलप हे करंजकर यांच्यासोबत होते.