“दादा माझी तुमच्यावरच श्रद्धा, म्हणून इथे” : बायको रुग्णालयात असूनही ठाकरेंचा शिलेदार राणेंच्या प्रचारात
राजापूर : आज मी जो काही आहे, तो केवळ दादांमुळे. माझी तुमच्यावर श्रद्धा आहे. त्यामुळेच माझी पत्नी हिंदुजामध्ये ऍडमिट असतानाही इथे आलो आहे, मी विकासासाठी नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबरोबर राहणार आहे, अशा शब्दात राजापूरचे शिवसेनेचे (ShivSena) माजी आमदार आणि सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असलेल्या गणपत कदम यांनी भाजपचे (BJP) रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी कदम यांनी 1999 मध्ये नारायण राणे यांच्यामुळे त्यांना तिकीट कसे मिळाले याबाबतची आठवणही सांगितली. (Former Shiv Sena MLA from Rajapur Ganpat Kadam announced his support for BJP’s Ratnagiri-Sindhudurg candidate Narayan Rane.)
कदम म्हणाले, मी वेगळ्या पक्षात आहे. ठाकरे गटात आहे. मी आज जरी दुसऱ्या पक्षात असलो तरी दादांबद्दलचे प्रेम कधीच कमी होणार नाही. माझी तुमच्यावर श्रद्धा कायम आहे. मी तुम्हाला मदत करणार. मी दादांजवळ काय असेल ते खाजगीत बोलीन. पण केवळ तुमच्यावर श्रद्धा आहे. आज मी जो काही आहे, तो दादांमुळे. नगरसेवक झालो, पण त्यानंतर जी सगळी पदे मिळाली, आमदारकी मिळाली ती फक्त दादांमुळेच मिळाली. शिवसेनेत एकदा जाहीर झालेले तिकीट बदलून आणणे शक्य नसते, पण ती किमया दादांनी केली आणि मी आमदार झालो, अशी आठवणही त्यांनी आवर्जून सांगितली.
“नार्वेकर आहेत तिथेच सुखी राहू देत, माझ्या त्यांना शुभेच्छा”; उमेदवारीच्या चर्चांना शिंदेंचा फुलस्टॉप!
गणपत कदम यांनी सांगितली 1999 सालची आठवण :
गणपत कदम म्हणाले, दादा मुख्यमंत्री होते. विधानसभेची निवडणूक जाहीर झाली होती. मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो. मला त्यांनी विचारलं “अरे तू इथे काय करतो? यादी जाहीर झाली आहे, कामाला लाग”. मी त्यांना म्हटलं “माझं नाव यादीत नाही, यादी पहा.” त्यांनी यादी पाहिली, माझं नाव नव्हतं. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मला गाडीत बसवलं. आम्ही मातोश्रीवर गेलो. तेव्हा बाळासाहेब ठाकरे त्यांना म्हणाले “नारायण आपली यादी जाहीर झाली आहे, आता आपण कोणी आले तरी बदल करू शकत नाही. तुला माहिती आहे.” त्यावर राणे साहेबांनी बाळासाहेबांना सांगितलं, “साहेब तुम्हाला या वेळेला नियम मोडून हा बदल करावाच लागेल. गणपतला उमेदवारी द्यावी लागेल” त्यानंतर बाळासाहेबांनी मला उमेदवारी दिली, अशा शब्दात कदम यांनी 1999 सालची आठवण सांगितली.