मुंबईने सर्वकाही दिले; आता जन्मभूमीतून नशिब अजमाविणार, कृपाशंकर सिंह यूपीतून लोकसभेच्या आखाड्यात !

  • Written By: Published:
मुंबईने सर्वकाही दिले; आता जन्मभूमीतून नशिब अजमाविणार, कृपाशंकर सिंह यूपीतून लोकसभेच्या आखाड्यात !

Kripashankar Singh get ticket Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीमधूनच निवडणूक लढविणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. या यादीत उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पण महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा जिंकण्याचा इरादा असलेल्या भाजपने येथील एकही उमेदवार जाहीर केला नाही. पण मुंबईत एकेकाळी काँग्रेसचे नेते राहिलेले व सध्या भाजपमध्ये असलेले कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांचे नाव मात्र उमेदवारीच्या यादीत आहे. ते उत्तर प्रदेशमधील जौनपूर (Jaunpur Loksabha Seat) लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्यावर तिनशे कोटींची बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचेही आरोपही आहेत.


BJP Candidate List : प्रज्ञा ठाकूरांचा पत्ता कट, भोपाळमधून कोणाला मिळाली उमेदवारी?

कृपाशंकर सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथील आहेत. त्यांचे वडिल स्वातंत्र्यसैनिक होते. कृपाशंकर सिंह हे रोजगारासाठी 1971 मध्ये मुंबईत आले होते. त्यांनी रस्त्यावर कांदे-बटाटे विकून उपजीविका केली. मुंबईतील एका कार्यक्रमात ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर ते काँग्रेससाठी काम करू लागले. उत्तर भारतीयांचा आवाज म्हणून कृपाशंकर सिंह यांना ओळखले जावू लागले. पक्षाने त्यांच्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. ते काँग्रेसचे राज्य सचिव होते. त्यानंतर नव्वदच्या दशकात ते विधानपरिषदेवर गेले. त्यानंतर आमदार झाले. 2004 च्या विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते.


Lok Sabha Election : भाजपचे 195 उमेदवार जाहीर : नितीन गडकरींना पहिल्या यादीतून डच्चू


तिनशे कोटींची बेहिशोबी मालमत्ता

तीन वेळा आमदार राहिलेले कृपाशंकर सिंह यांच्याकडे एकूण साडेतीन कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. परंतु त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कारवाई झाली. त्यात त्यांच्याकडे 320 कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. बारा ठिकाणी जमिन, प्लॅट आणि जंगम मालमत्ता त्यांच्याकडे आहे. पत्नी, मुलगी व इतर नातेवाइकांच्या नावावर बेनामी संपत्ती आढळून आली आहे. त्यांच्याविरोधात मुंबईतील निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे.

भाजपमध्ये प्रवेश, दुहेरी फायदा

कृपाशंकर सिंह हे बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अडचणीत आले होते. इडी, सीबीआय या यंत्रणेकडून तब्बल सात वर्ष त्यांची चौकशी सुरू होती. त्यामुळे ते काँग्रेसपासून दूर गेले होते. 2021 मध्ये ते भाजपवासी झाले. पक्ष संघटनेत त्यांना पदही देण्यात आले होते. आता त्यांनी थेट मूळ गावातून लोकसभेची तिकीट मिळाले आहे. याचा भाजपला उत्तर प्रदेशबरोबर मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मतांचा फायदाही होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube