Nashik Lok Sabha : … म्हणून छगन भुजबळ संतापले, महायुतीच्या नेत्यांना दिली 20 मेची डेडलाईन
Nashik Lok Sabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha) राज्यात महाविकास आघाडीकडून (MVA) सर्व जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर महायुतीमध्ये (Mahayuti) अद्याप देखील काही जागांवरून तिढा कायम असल्याने या जागांवर उमेदवार कोण असणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी (Nashik Lok Sabha) उमेदवार जाहीर होत नसल्याने संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मतभेद समोर आले आहेत. यामुळे महायुतीकडून लोकसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ की शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase) यांपैकी कुणाला संधी मिळणार यावरून नाशिकमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे.
आज रामनवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात छगन भुजबळ दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सगळ्यांना सुखी ठेवा, मंदिरातून आशीर्वादचा हार घेऊन आलोय. प्रभू राम आणि देव निवडणुकीत येणार नाहीत. हेमंत गोडसे माझे मित्र आहेत. मी पण अनेकवेळा येथील मंदिरात आलो. आज राम नवमीनिमित्त दर्शन घेण्यासाठी आलो असता, ते पण मंदिरात आले होते. त्यावेळी, मी त्यांना शुभेच्छा दिल्या, असे भुजबळ म्हणाले.
लोकसभा निवडणुकानिमित्ताने मी चंद्रपूरमध्ये गेलो होतो आणि तेथील उमेदवारासाठी प्रचार केला. तर नाशिकच्या जागेवरून भुजबळ म्हणाले, महायुतीकडून ज्यांना उमेदवारी द्यायची आहे त्यांना द्या मात्र 20 मे च्या आधी निर्णय घ्या कारण 20 मे चा मुहूर्त आहे यामुळे त्यापूर्वी निणर्य झाला तर बरं होईल असं माध्यमांना भुजबळ म्हणाले.
नुकतंच समोर आलेल्या नवीन ओपिनियन पोलबद्दल भुजबळ यांना प्रश्न विचारला असता त्यावर भुजबळ म्हणाले, निवडणुकीच्या प्रचाराची अजून सुरुवात आहे यामुळे हळूहळू सर्वेत आमच्या जागा वाढतील. राज्यात आणि नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि इतर काही नेत्यांच्या सभा होणार आहेत यामुळे हळूहळू आमच्या जागा वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाशिकमध्ये शिवसेनेचा विद्यमान खासदार असल्याने या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली तर या जागेवरून मंत्री छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यामुळे या जागेवरून महायुतीकडून कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.