तुम्ही पालकमंत्री झालात की मुख्यमंत्री…, नाशिक कुंभमेळ्याच्या 35 हजार कोटींच्या निधीवरून पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनासह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले.
नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, या खर्चावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरले आहे. कुंभमेळ्यासाठी एवढ्या मोठ्या निधीची आवश्यकता नेमकी कशासाठी आहे, याचा सविस्तर तपशील सरकारने जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली. नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनासह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले.
मागील कुंभमेळ्याला सुमारे ४० लाख भाविक उपस्थित होते, तर यावेळी तब्बल ६ कोटी भाविक येतील, असा सरकारचा अंदाज आहे. मात्र, हा आकडा कोणत्या शास्त्रीय अभ्यासाच्या आधारे निश्चित करण्यात आला, असा सवाल चव्हाण यांनी केला. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये दाखल झाल्यास शहराची वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था आणि अन्य पायाभूत सुविधा हा भार पेलू शकतील का, याचा पुरेसा विचार झाला आहे का, हे स्पष्ट करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते! दलवाईंचा दावा, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा
मागील कुंभमेळ्यासाठी साधारण तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला होता. त्या तुलनेत यावेळी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याने खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने या संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर सार्वजनिक करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. कुंभमेळ्याच्या नावाखाली जनतेच्या पैशाचा वापर होत असल्याने प्रत्येक रुपयाच्या खर्चात पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आल्याच्या निर्णयावरही चव्हाण यांनी आक्षेप घेतला. हे नवीन मंत्रिपद कोणत्या मंत्रालयाच्या अधिकारात निर्माण करण्यात आले, त्यासाठी कोणती प्रशासकीय प्रक्रिया पार पडली आणि मुख्यमंत्र्यांनी कोणत्या अधिकाराचा वापर करून ही नियुक्ती केली, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी केली. या निर्णयामागील प्रशासकीय रचना जनतेसमोर येणे गरजेचे असल्याचे चव्हाण म्हणाले.
कुंभमेळ्याचा निधी नगरविकास विभागामार्फत खर्च होत नसल्याने या संपूर्ण प्रक्रियेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका नेमकी काय आहे, असाही सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. शिंदे यांना बाजूला ठेवण्यासाठीच गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री आणि त्यानंतर नाशिकचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. महाजन यांच्यावर निशाणा साधताना, पालकमंत्री झाल्यानंतर ते नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखे वागत असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.
कुंभमेळ्यासाठी निधी देण्यास आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना चव्हाण यांनी खर्चाच्या पारदर्शकतेवर भर दिला. डीपीआर, नियोजन आणि खर्चाचा सविस्तर तपशील सार्वजनिक केल्याशिवाय एवढ्या मोठ्या निधीचा विनियोग करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. कुंभमेळा हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा सोहळा असून भाविकांना आवश्यक सुविधा मिळायलाच हव्यात, मात्र त्यासाठीच्या खर्चाचे योग्य नियोजन आणि उत्तरदायित्वही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिकच्या पायाभूत सुविधांवरूनही चव्हाण यांनी सरकारवर टीका केली. आपण पहिल्यांदाच समृद्धी महामार्गाने नाशिककडे आलो, मात्र शहरात येण्यासाठी योग्य दिशादर्शक फलक नसल्याने रस्ता चुकला आणि बराच वेळ फिरावे लागले, असे त्यांनी सांगितले. आधुनिक शहर म्हणून नाशिकचा विकास होत असताना अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होता कामा नये. नाशिकमध्ये येताना रस्त्यांवरील खड्ड्यांचाही अनुभव आला, असे सांगत चव्हाण यांनी कुंभमेळ्यापूर्वी शहरातील पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती सुधारण्याची गरज अधोरेखित केली.