प्रजासत्ताकदिनी मुंबईकरांना मोठं गिफ्ट; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोड- वरिळी बांद्रा सिलिंक जोडणाऱ्या मार्गीकेचे लोकार्पण
Inauguration of a Bridge on Coastal Road : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. (Coastal ) या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज होत आहे.
वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन आदी भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावर ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पण देखील यावेळी होणार आहे. सोमवार, दिनांक २७ जानेवारी २०२५ पासून या सर्व मार्गिंकावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे. तसंच, मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा एका अटीसह खुला
मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे.
या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. आजपर्यंत प्रकल्पाची ९४ टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून दिनांक १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ५० लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.
या प्रकल्पातील दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक वरळी-वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत. त्यातील दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी झाले. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी या दक्षिण वाहिनी पुलावरून उत्तरेकडे (वांद्रेकडे) जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. आता उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पुलावरून नियमित दिशांकडे वाहतूक सुरू होणार आहे.
लोकार्पण होणाऱ्या पुलाची लांबी ८२७ मीटर इतकी आहे. यामध्ये समुद्रावर असलेली लांबी ६९९ मीटर तर पोहोच रस्ता १२८ मीटर यांचा समावेश आहे. हा पूल बांधण्यासाठी सुमारे २४०० मेट्रिक टन वजनाची तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) स्थापन करण्यात आला होता. या तुळईची लांबी १४३ मीटर तर रुंदी २७ मीटर आणि उंची ३१ मीटर इतकी आहे.
मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी स्थापन करण्यात आली. तर, वांद्रे – वरळी सागरी सेतूकडे जाणा-या मार्गावरील दुसरी तुळईदेखील दिनांक १५ मे २०२४ रोजी स्थापन करण्यात आली. तुळई स्थापन केल्यानंतर पूल बांधणीची पुढील कामे वेगाने पूर्ण करण्यात आली.
दोन्ही पुलांचे काम पूर्ण झाल्यामुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील दोन्ही टोक आता थेट जोडले गेले आहेत. परिणामी शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) ते वांद्रे असा उत्तर दिशेने आणि वांद्रे ते शामलदास गांधी मार्ग असा दक्षिण दिशेने म्हणजेच दुतर्फा प्रवास करणे शक्य झाले आहे.