प्रसिद्ध पंजाबी गायक तेजी काहलोंवर कॅनडामध्ये गोळीबार; ‘या’ गँगने जबाबदारी स्वीकारली अन् कारणही सांगितलं
या पोस्टमध्ये रोहित गोदाराच्या गँगने इतरही काही बिझनेसमन, बिल्डर्सनाही शत्रू गँगला मदत करण्यापासून इशारा दिला आहे.

प्रसिद्ध पंजाबी गायक तेजी काहलोंवर कॅनडामध्ये गोळीबार झाला आहे. (Fire) गँगस्टर रोहित गोदाराशी संबंधित गुंडांनी तेजीवर गोळीबारीची जबाबदारी स्वीकारली आहे. रोहित गोदारा हा राजस्थानमधील कुख्यात गँगस्टर आहे. त्याच्या गँगकडून यासंदर्भा सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्यात आली आहे. फेसबुकवरील या पोस्टमध्ये त्यांनी तेजीवर गोळीबार करण्यामागचं कारणसुद्धा सांगितलं आहे.
तेजी काहलोंच्या पोटात गोळी लागली असून तो या हल्ल्यात थोडक्यात बचावल्याचं कळतंय. शत्रू गँगला तेजी पैसा आणि शस्त्रे पुरवत होता, म्हणून त्याच्यावर गोळीबार केल्याचं पोस्टमध्ये म्हटलंय. फेसबुकवर महेंद्र सरन दिलाना, राहुल रिनाऊ आणि विकी फलवान यांनी गोळीबारात तेजी जखमी झाल्याचा दावा केला आहे. ‘कॅनडामध्ये आम्ही तेजी काहलोंवर गोळीबार केला आहे. त्याच्या पोटात गोळी लागली आहे. यातून त्याला समजलं तर ठीक, अन्यथा पुढच्या वेळेस आम्ही थेट त्याला संपवू’, अशी धमकी या पोस्टद्वारे देण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीला धक्का, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय; दहशतवादी संघटना म्हणून घोषित
या पोस्टमध्ये रोहित गोदाराच्या गँगने इतरही काही बिझनेसमन, बिल्डर्स आणि आर्थिक मध्यस्थांसह इतरांनाही शत्रू गँगला मदत करण्यापासून इशारा दिला आहे. शत्रू गँगची मदत करणाऱ्यांनाही अशीच शिक्षा भोगावी लागेल, असं त्यात लिहिलंय. ‘मी हे स्पष्ट करतो की, जर कोणीही चुकूनही आमच्या शत्रूंना पाठिंबा दिला किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली, तर आम्ही त्याच्या कुटुंबीयांना सोडणार नाही. आम्ही त्यांचा सर्वनाश करू. हा इतरांना, व्यापाऱ्यांना, बिल्डर्सना, हवाला ऑपरेटर्सनाही इशारा आहे.
जर कोणी मदत केली तर ते आमचे शत्रू असतील. ही फक्त सुरुवात आहे. पुढे काय होतं ते पहा’, अशी धमकी रोहित गोदाराच्या गँगने दिली आहे. काही दिवसांपूर्वीच लॉरेन्स बिष्णोईचा जवळचा सहकारी हरी बॉक्सरवर अमेरिकेत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेचीही जबाबदारी रोहित गोदाराने स्वीकारली होती. त्याने आणि गोल्डी ब्रारने मिळून कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या गोळीबाराचा कट रचला होता, अशी माहिती फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली होती. गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा हे राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अनेक राज्य पोलीस युनिट्सना वाँटेड आहेत. गोल्डी ब्रार हा अमेरिकेत तर रोहित गोदारा हा युकेमध्ये असल्याचा संशय आहे. तर लॉरेन्स बिष्णोई हा गुजरातमधील तुरुंगात कैद आहे.