मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात वादळी पाऊस; हवामान विभागाचा अंदाज काय?

देशात मागील चोवीस तासात राजस्थान येथील बारमेर येथे उच्चांकी ४८.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

News Photo   2026 05 13T184043.022

राज्यात उष्णतेचा चटका वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. (Heat) काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाचा इशारा असून उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

आज उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी दिवसा उष्णतेची लाट तर रात्री उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. तर सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान

त्याचबरोबर धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह वादळी वारे आणि पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज असून विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक वादळी वारे, गारपीटीसह पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसंच, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडटासह वादळी वारे, हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. देशात मागील चोवीस तासात राजस्थान येथील बारमेर येथे उच्चांकी ४८.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

राज्यात अकोला येथे उच्चांकी ४५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव येथे ४५.५, अमरावती ४५.४, वर्धा ४४.२, छत्रपती संभाजीनगर ४३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार होत असून राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. १६ मे म्हणजेच शनिवारपर्यंत दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, अंदमान समुद्र आणि अंदमान व निकोबार बेटांवर मॉन्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

follow us