Letsupp Special : गुणरत्न सदावर्ते अन् देवेंद्र फडणवीस खरंच मित्र आहेत?

Letsupp Special : गुणरत्न सदावर्ते अन् देवेंद्र फडणवीस खरंच मित्र आहेत?

मुंबई : “देवेंद्र फडणवीस, त्या गुणरत्न सदार्तेला समजावा. तो तुमचाच कार्यकर्ता आहे. त्याला मराठ्यांच्या अंगावर सोडू नका. मराठ्यांना उचकवू नका” असं जाहीरपणे म्हणत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकांमुळे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण यामुळे फडणवीस यांच्याबद्दलही मराठा समाजाच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. खरंच फडणवीस आणि सदावर्ते यांच्यात काही संबंध आहे का? खरंच सदावर्ते हे फडणवीस यांचे कार्यकर्ते आहेत का? की आणखी त्यापेक्षा काही जास्त आहेत? असे अनेक सवाल मराठा समाजाच्या मनात येऊ लागले आहेत. (Adv. Gunaratna Sadavarte and DCM Devendra Fadnavis friendship)

मूळचे नांदेडचे असलेल्या सदावर्ते यांनी मुंबईला आपली कर्मभूमी बनविलं आहे. पण त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. यावेळी विद्यार्थी दशेत आणि महाविद्यालयीन जीवनात असल्यापासूनच त्यांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून चळवळींमध्ये उतरायला सुरुवात केली होती. वकिलीसाठी ते मुंबईत आले, स्थिरस्थावर झाले. हुशारीमुळे त्यांचे चांगले नाव झाले. काही दिवसांतच ते नामांकित वकिलांच्या यादीत गणले जाऊ लागले. मुंबईमध्ये वकिली करताना सदावर्ते हे मॅटच्या बार असोसिएशनचे दोनदा अध्यक्ष राहिले. शिवाय ते बार कॉऊंसिलच्या शिखर परिषदेवर देखील होते.

तुम्ही पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करत असाल तर आम्ही…; उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

या दरम्यान ते पहिल्यांदा चर्चेत आले ते छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या छत्रपती पदवीला विरोध करुन. त्यावेळी मराठा समाज आणि सदावर्ते यांच्यात मोठा वाद झाला होता. नंतरच्या काळात ते मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील म्हणून महाराष्ट्राला परिचीत झाले. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याच याचिकेवरुन मराठा आरक्षण रद्दबातल करण्यात आले होते. सदावर्ते एवढ्यावर थांबले नाहीत. ते उघड उघड मराठा समाज आणि विविध राजकीय नेत्यांवर आगपाखड करत राहिले. यात शरद पवार त्यांच्या निशाण्यावर असायचे.

त्याचवेळी ते भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच अनेकदा समर्थन करताना दिसून आले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेतलं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. यामुळे ते भाजपच्या जवळ असल्याचे बोलले जाऊ लागले. अशात फडणवीस यांनी ज्या अनिल देशमुख प्रकरणामध्ये महाराष्ट्रभर वातावरण तापलं होतं त्याप्रकरणातही सदावर्ते यांनी एन्ट्री घेतली. सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याच याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. यावेळी पहिल्यांदा फडणवीस यांची ताकद सदावर्ते यांना असल्याचे उघडपणे बोलले गेले.

जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे पवारांचा हात, शरद पवारांनीच दिले थेट उत्तर

यानंतर महाराष्ट्रात एसटी आंदोलनाने डोकं वर काढलं. हा हा म्हणता आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केलं. सुरुवातीला तत्कालिन भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या नेत्यांनी आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारलं. त्यामुळे हा बंद भाजप पुरस्कृत आहे का? असा सवाल विचारला जाऊ लागला. १२ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा निघाला त्यानंतर एसटी महामंडळाने वेतन वाढ जाहीर केली. तेव्हा ‘अखेर संप संपला’ असं वाटलं. खोत आणि पडळकर हे नेते आंदोलनातून बाहेर पडले आणि एन्ट्री झाली गुणरत्न सदावर्ते यांची. ‘मी खोत आणि पडळकर यांना आंदोलनातून आझाद करत असल्याचं’ म्हणत एकही रुपया न घेता हा कर्मचाऱ्यांचा लढा लढण्याचं सदावर्ते यांनी जाहीर केलं.

या संपूर्ण काळात सदावर्ते नित्यनियमाने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर टीका करत राहिले. तर फडणवीस यांचं कौतुक करत होते. या दरम्यान, पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली. मात्र बाहेर आल्यानंतर केलेल्या मदतीबद्दल त्यांनी भाजपचे जाहीर आभार मानले. एसटीचा संप मिटल्यानंतर एसटी बँक निवडणुकीत सदावर्ते यांनी पॅनेल टाकले आणि रिंगणात उडी घेतली. यात त्यांच्या पॅनेलने यश मिळत बँकेची सत्ता हस्तगत केली.

या निवडणुकीत सदावर्ते यांना फडणवीस यांना मदत केली असल्याच्या चर्चा रंगल्या. सदावर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही तोंडभरुन कौतुक करतात. सदावर्ते आणि फडणवीस यांच्यात त्या दोघांना आजवर कधीही एकत्र पाहिलं गेलेलं नाही, तरीही त्यांच्यात कायम मैत्री असल्याच्या चर्चा होतात. स्वतः सदावर्ते हे फडणवीस माझे अत्यंत आवडते नेते असल्याचे सांगतात. इतकंच नाही तर I love You देवेंद्र फडणवीस असं एकदा त्यांनी त्यांच्या उत्साहाच्या भरात म्हंटलं होतं. फडणवीस जनसामान्यांचे प्रश्न सोडवतात त्यामुळे ते आपल्याला आवडतात असं त्यांनी सांगितलं होतं.

मात्र त्याचवेळी भाजपने आजवर कधीही उघडपणे सदावर्ते यांच्या कोणत्याही भुमिकेला दुजोरा दिलेला नाही. सदावर्ते यांचा आणि भाजपचा काही संबंध असल्याचं कधीही समोर आलेलं नाही. भाजपचे नेते देखील सदावर्ते यांच्यापासून अंतर राखून असतात. काल जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही, हे अवघ्या जगाला ठावूक आहे. पण, तरीही असा प्रचार शरद पवार गटाकडून नेहमीच केला जातो, असं म्हणत पुन्हा एकदा सदावर्ते आणि भाजप यांच्यातील संबंधांच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तुम्हाला काय वाटतं? खरंच फडणवीस आणि सदावर्ते यांच्यात काही संबंध आहे का? खरंच सदावर्ते हे फडणवीस यांचे कार्यकर्ते आहेत का? याबाबतची तुमची मत आम्हाला कमेंट करुन सांगा आणि लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनेलला फॉलो करायला विसरु नका.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube