Azad Maidan : स्वांतत्र्य चळवळीचं आंदोलन ते महायुतीचा ग्रॅंड शपथविधी; आझाद मैदानावरच का?
Azad Maidan : भारताच्या स्वातंत्र्यासीठीच्या चळवळींपासून मुंबईतील आझाद मैदान (Azad Maidan) नेहमीच केंद्रस्थानी राहिलंय. मागील काही वर्षांत या मैदानात आजतागायत कामगार आंदोलन, शेतकरी आंदोलन, विद्यार्थी आंदोलनासह मराठा आरक्षणासाठीही या मैदानात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली आहेत. तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात 1942 साली ‘चले जाव’ आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. त्यामुळे आझाद मैदान ऐतिहासिक घडामोडींचा एक साक्षीदार असल्याचं इतिहासात नमूद आहे. आता राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा याच मैदानात मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. मुंबई महापालिकेच्या आयकॉनिक इमारतीसमोर आणि व्हिक्टोरिया टर्मिनस (सीएसटी) स्थानकाच्या जवळ असलेले हे मैदान आपल्या ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्वामुळे चांगलच चर्चेत आहे. महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार असलेल्या या मैदानाची ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आपण सविस्तर जाणून घेऊयात…
शिंदे, पवार अन् PM मोदींचे आभार! देवेंद्र फडणवीसांनी सांगितला शपथविधीनंतरचा रोडमॅप
महायुतीचा ग्रॅंड शपथविधी सोहळा…
महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला असून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीचा ग्रॅंड शपथविधी सोहळा उद्या आझाद मैदानावर संपन्न होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह धर्मगुरुंनाही निमंत्रण देण्यात आलंय.
या शपथविधी सोहळ्यासाठी तीन व्यासपीठं तयार करण्यात आले असून शपथविधी सोहळ्याला 40 हजारांची आसन क्षमता असणार आहे. या सोहळ्यात लाडक्या बहिणींसाठीची राखीव आसन व्यवस्था करण्यात आलीयं. तर दोन हजार व्हीव्हीआयपी पासचे वाटप करण्यात आले आहे.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी चवळवळींचा एक महत्वाचा टप्पा आझाद मैदानावर सुरू झाला होता. ब्रिटीश काळात आझाद मैदान हे सार्वजनिक सभांसाठी, मोर्चांसाठी आणि आंदोलकांसाठी एक प्रमुख केंद्रच बनलं होतं. याच मैदानात भारताच्या स्वातंत्र्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासह इतर अनेक नेत्यांच्या जाहीर सभा पार पडल्या आहेत. एवढचं नाही तर 1930 च्या ध्वज सत्याग्रहाच्या वेळीही आझाद मैदानाने ऐतिहासिक घटना पाहिलीयं. ब्रिटिशांनी तिरंगा ध्वज फडकवण्यावर बंदी घातली असताना, स्वातंत्र्यसैनिक अवंतिकाबाई गोखले यांनी मैदानावर तिरंगा फडकवला. यावेळी झालेल्या लाठीमाराच्या विरोधात लोक मोठ्या प्रमाणावर मैदानात जमले होते. याशिवाय 28 डिसेंबर 1931 रोजी महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ देखील या ठिकाणी झाली होती.
“मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, लढणारच!” बाळासाहेब थोरातांनी आता ठरवलंच
आझाद मैदानावर ‘चले जाव’चं मोठं आंदोलन…
1942 च्या ‘चले जाव’ चळवळीच्या वेळेस आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली होती. यामुळे स्वातंत्र्य चळवळीत या मैदानाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. आझाद मैदानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक न्याय आणि अधिकारांच्या लढ्यांचे हे प्रमुख ठिकाण आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळातदेखील, कामगारांचे हक्क, शेतकऱ्यांचे प्रश्न, तसेच महिला व विद्यार्थ्यांचे आंदोलन यांसाठी आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणावर सभा आणि निदर्शने होत असतात. या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देखील आंदोलने करण्यात आली होती.
क्रांतिकारकांना तोफांना बांधून ठार केलं…
1857 च्या उठावाच्या वेळी आझाद मैदानावर एक भयंकर प्रसंग घडला होता. उत्तर भारतात ब्रिटिशांविरोधातील बंड उफाळले असताना, मुंबईतील ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात देखील असंतोषाची चिन्हे होती. ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करण्याचा कट रचणाऱ्या सय्यद हुसेन आणि मंगल गाडिया या दोन क्रांतिकारकांची माहिती एका गुप्तहेराने ब्रिटिशांना दिली. त्यांना पकडून 18 ऑक्टोबर 1857 रोजी आझाद मैदानावर तोफांना बांधून ठार करण्यात आले. हा भयंकर प्रकार जनतेला इशारा देण्यासाठी ब्रिटीशांनी उघडपणे दाखवला होता. हा उठाव अपयशी ठरला, तरी या घटनेमुळे स्वातंत्र्याच्या लढ्याची धग कायम राहिली.
शिंदे अलर्ट मोडवर, पवार दिल्लीला तर शाह चंदिगढला रवाना; महायुतीत नेमकं चाललंय काय?
दरम्यान, या ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीमुळे 5 डिसेंबरच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानाची निवड ही महत्त्वपूर्ण ठरते. शपथविधी केवळ प्रशासनिक प्रक्रिया नसून, लोकशाहीतील एक महत्त्वाचा प्रसंग आहे. यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची निवड हे लोकांच्या भावनांशी जोडलेले आहे. आझाद मैदानाची ही निवड म्हणजे जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या चळवळींना सलाम करण्याचा एक मार्ग आहे.
शपथविधी हा नवा अध्याय सुरू करण्याचा क्षण असतो. आझाद मैदानाच्या ऐतिहासिक वारशाचा आदर करत, या ठिकाणी शपथविधी होणे हे लोकशाहीतील पारदर्शकता, लोकसहभाग आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक मानले जाईल. यामुळे आझाद मैदानाला पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे. यामुळे या मैदानचे महत्त्व आणखीनच वाढलंय.