राम शिंदे अन् रोहित पवारांचा संघर्ष पेटणार, कार्यकर्त्यावर होणार विशेषाधिकार भंगाची कारवाई

प्रचार सभेत मोरे यांचं भाषण चालू असताना  रोहित पवार हे हसत होते, असंही दरेकर यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. 

  • Written By: Published:
News Photo   2025 11 25T222753.948
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच विधान परिषद (Election) सदस्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल शरद पवार गटाचे कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची कारवाई करावी, अशी मागणी आपण आणि श्रीकांत भारतीय यांनी विधीमंडळाकडे केली आहे, अशी माहिती भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते व गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
दरेकर यांनी सांगितले की, 23 नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषद, विधान परिषदेचे सदस्य व परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक भाषेत वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे विधान परिषदेची अप्रतिष्ठा झाली असल्यामुळे मोरे यांच्यावर विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मोरे यांनी विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह विधान परिषदेचा तसेच प्रत्येक विधान परिषद सदस्याचा अपमान केला आहे.
सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषदेचे सर्व सदस्य, सभापती, विधान परिषदेबद्दल असत्य, दिशाभूल करणारी माहिती देत सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला आहे. यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा, विश्वासार्हता, स्वायत्तता धोक्यात आली आहे. संविधान कलम 194 नुसार राज्य विधानमंडळ व त्यांचे सदस्य यांना विशेषाधिकार व स्वातंत्र्य प्रदान केले आहे. सभागृहाची प्रतिष्ठा कमी करणारी कोणतीही कृती जर सभागृहाच्या कामकाजावर परिणाम करत असेल तर ती कृती विशेषाधिकार भंग कृती ठरते. मोरे यांच्यावर विशेषाधिकार भंग केल्याबद्दल कारवाई व्हावी, असं दरेकर यांनी नमूद केले.
मोरे यांचं भाषण चालू असताना  रोहित पवार हे हसत होते, असंही दरेकर यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.
 दरेकर म्हणाले की, मोरे यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे विधान परिषदेचे 1993 -1996 दरम्यान सदस्य तर 1995 ते 1996 विरोधी पक्ष नेते होते. सुप्रिया सुळे ही 2006-09 राज्यसभा सभासद होत्या. उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण देखील विधान परिषदेचे सभासद आहेत आणि होते. शप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे देखील विधान परिषदेचे सदस्य आहेत. मोरे यांनी ज्या हीन भाषेत शिंदे यांच्यावर अवमानकारक टिप्पणी केली ती टिप्पणी पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण  यांनाही लागू होते का? असा परखड सवाल  दरेकर यांनी केला आहे.
राज्यसभेचे प्रतिरूप म्हणून विधान परिषद सभागृह कार्यरत असते. संविधान निर्मात्यांनी विधान परिषदेची निर्मिती केली आहे. विधान परिषद सदस्य म्हणजे उडालेले बल्ब अशी अवहेलना दुर्दैवी बाब आहे. ही शेरेबाजी अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या भारतीय राज्यघटनेचा घोर अवमान करणारी आहे असेही त्यांनी नमूद केले. तसंच, मविआ नेत्यांचा विश्वास ढासळला आहे. त्यांची निवडणुकीच्या मैदानात येऊन  लढण्याची ना उमेद आहे ना धमक आहे. महायुतीचा कारभार स्वच्छ पारदर्शक असल्याने टीका करायलाही वाव नाही. अशा स्थितीत मविआ नेते रडीचा डाव खेळत आहेत. भाजपावर विश्वास असल्याने 100 ठिकाणी बिनविरोध नगरसेवकांची निवड झाली त्यामुळे पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे गंभीर आरोप करत नवनवीन रडण्याचे डाव खेळत आहेत अशी टीकाही दरेकर यांनी केली.

follow us