Letsupp Exclusive – ठरल! दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच लढणार हो…
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पुणे, पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या ठिकाणी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची खात्रीदायक माहिती.
विष्णू सानप – Letsupp प्रतिनिधी
Both nationalists will contest the elections together. : गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा रंगत होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पुणे पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्रातल्या(Maharashtra) महत्त्वाच्या ठिकाणी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची खात्रीदायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज दिवसभर मोठ्या हालचाली घडल्या आहेत. मुंबईत राष्ट्रवादीची बैठक पार पडत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) दिवसभर पुण्यात होते. शिंदे माध्यमांशी दोनदा बोलले मात्र त्यांनी पत्ते उघड केले नाही. मात्र इतर स्थानिक नेत्यांनी नाव न सांगण्याचा अटीवर दोन्ही राष्ट्रवादी(NCP) एकत्रची फक्त घोषणा बाकी असल्याचे सांगितले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर मी राजकारणातून काही काळासाठी संन्यास घेईल अशी भूमिका मांडणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आज शशिकांत शिंदे यांच्यासोबत होते मात्र ते नेहमीसारखे उत्साही पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळे शशिकांत शिंदे हे आज फक्त प्रशांत जगताप यांची मनधरणी करण्याकरिता पुण्यात आले होते की काय अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असून लवकरच याची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे. वरिष्ठ पातळीवर सर्व चर्चा झाली असून फक्त जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा सुरू आहे. पुणे, मुंबई नव्हे तर महाराष्ट्रभर युती होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती होणार का? यावर राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
