अगोदर क्लिनचीट आता टाळाटाळ! मुख्यमंत्री फडणवीसांनी निंबाळकरांना भेट नाकारली, नक्की काय घडलं?

या प्रकरणानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरील संशय अधिक गडद झाला असला तरी त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 10 29T213148.656

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. (Phaltan) या प्रकरणात पोलिसांनी (PSI) गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना ताब्यात घेतलं असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहाय्यकावरही मृत डॉक्टरवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात असताना निंबाळकर यांना भेट नाकारल्याची बातमी समोर आल्याने उलट-सुलट चर्चांना उधान आलं आहे.

या प्रकरणानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरील संशय अधिक गडद झाला असला तरी त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या मृत्यूला आत्महत्या नसून हत्या ठरवत, त्यामागे निंबाळकर यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Video : फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणात अंधारेंनी समोर आणला महत्त्वाचा पॉईंट; पुरावाही दाखवला

आज निंबाळकर हे पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आले होते. फडणवीस हे त्या वेळी पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये “ग्रँड चॅलेंज टूर” सायकल स्पर्धेच्या अनावरण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र, निंबाळकर हॉटेलमध्ये पोहोचले असतानाच फडणवीस कार्यक्रम आटोपून थेट विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे दोघांची भेट न झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, याआधी फलटण येथील एका कार्यक्रमात फडणवीस यांनी केलेल्या भाषणातून निंबाळकर यांना अप्रत्यक्षरीत्या क्लीनचिट दिली होती. मात्र, त्यानंतर निंबाळकर यांच्यावर नवीन आरोप होऊ लागल्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याशी अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला तर नाही ना?,असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान, निंबाळकर यांनी पुण्यात कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेतल्याचे समजते. त्यांनी येत्या शनिवारी फलटण येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या विरोधातील सर्व आरोपांना सविस्तर उत्तर देणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या वातावरणात मुख्यमंत्री फडणवीस यांच निंबाळकरांपासून ठेवलेल अंतर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी लावलेल्या आरोपांची मालिका यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.आता या प्रकरणाला पुढे काय वळण लागत आणि तपासात काय पुढ येत याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

follow us