पंतप्रधान कार्यालय ते पुणे पोलीस… सगळ्यांना कामाला लावून IAS पूजा खेडकर गेल्या तरी कुठे?
पुणे : पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय कार्मिक मंत्रालय, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, लाल बहाद्दुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी, महाराष्ट्र सरकार, महसूल प्रशासन, पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस, अहमदनगर जिल्हा रुग्णालय, पिंपरी-चिंचवडचे सामान्य रुग्णालय अशा सगळ्या यंत्रणांना कामाला लावून वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) या गेल्यात तरी कुठे? असा सवाल सध्या विचारला जात आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) खेडकर यांना तीनवेळा समन्स बजावले, पण त्या हजर झाल्या नाहीत, मसुरीच्या अकादमीमध्ये त्यांना 23 जुलैपर्यंत हजर होण्यास सांगितले होते. पण त्या तिथेही गेलेल्या नाहीत. (Controversial IAS officer Pooja Khedkar is being searched by Pune Police and investigative agencies.)
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांना तीन समन्स बजावूनही त्या पुणे पोलिसांसमोर जबाब नोंदविण्यास हजर झाल्या नाहीत. खेडकर यांच्याशी गेल्या आठवडाभरापासून पोलीस संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्या संपर्कक्षेत्राबाहेर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी देत आहेत. पुणे पोलिसांनी याआधीही त्यांना दोनदा समन्स बजाविले होते. त्यावेळी खेडकर यांनी पोलिसांकडे अवधी मागितला होता. मात्र, आठवडाभरानंतरही त्या पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत. त्यामुळे जबाब नोंदविण्यास उपस्थित राहावे, असे समन्स पोलिसांनी त्यांना पुन्हा बजावले. तरीही त्या हजर झालेल्या नाहीत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नोटिशीलाही केराची टोपली :
केंद्रीय लोकसेवा आयोगानेही खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाव बदलून परीक्षा देणे, आयोगाची फसवणूक करणे अशा आरोपांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय तुमची निवडच का रद्द करु नये, याबाबत उत्तर देण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पण त्यांनी अद्याप या नोटिशीला देखील उत्तर दिले नसल्याची माहिती आहे. दरम्यान, माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी “आता आपल्याकडे पळवाट राहिली नाही हे त्यांना कळलं असावं, त्यामुळे त्या पळून गेल्या असाव्यात,” असा दावा केला आहे.
अनिल देशमुखांनीच भेटायला बोलावलं होतं; समीत कदमांनी ‘ती’ घटना सांगत केला मोठा गौप्यस्फोट
काय आहेत आरोप?
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कार्यालयात राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालय, कार्मिक मंत्रालय, केंद्रीय लोकसेवा आयोग, मसुरी येथील लाल बहाद्दूर शास्त्री अकादमी अशा सर्वांनी अहवाल मागविला होता. यापूर्वी राज्य शासनाने सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने परत बोलावून घेतले आहे. 23 जुलैपर्यंत त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य शासनानेही त्यांना तातडीने कार्यमुक्त केले.
पूजा खेडकर यांना युपीएससी परिक्षेत 821 वी रँक मिळाली होती. त्यानंतरही त्यांना आयएएस केडर मिळाले. यासाठी त्यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला जात आहे. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून खेडकर यांनी दृष्टीहीन असून दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. यासोबतच त्यांची निवड ओबीसी प्रवर्गातून झाली होती. यासाठी वडिलांचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा अधिक असूनही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अनिल देशमुखांनीच भेटायला बोलावलं होतं; समीत कदमांनी ‘ती’ घटना सांगत केला मोठा गौप्यस्फोट
पूजा खेडकर यांनी अपंग प्रमाणपत्रासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रयत्न केले. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग असल्याच्या प्रमाणपत्रासाठी त्यांनी पाथर्डी तालुक्यातील भालगावचा पत्ता सादर केला होता. तर दुसरीकडे पुण्यातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून अपंग प्रमाणपत्रासाठी पिंपरी चिंचवडचा पत्ता दिला होता. पिंपरी चिंचवड परिसरातील त्यांच्या पत्त्यावर आई मनोरमा खेडकर यांची कंपनीस्थित आहे. ही कंपनीदेखील अनधिकृत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
दरम्यान, पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनाही जमिनीच्या वादातून मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणी त्यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. तर वडील दिलीप खेडकर यांना न्यायालयाने 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.