मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा, योग्य निर्णयाचे प्रयत्न सुरु : फडणवीसांची जरांगेंना कळकळीची विनंती
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातले आहे, जो काही योग्य निर्णय असेल त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची कळकळीची विनंती केली. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis requested Maratha reservation agitator Manoj Jarange Patil to call off his hunger strike)
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. याकाळात त्यांनी अन्न-पाणी कशाचेही सेवन केलेले नाही. याशिवाय त्यांनी उपचार घेण्यासाठी डॉक्टरांना नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे, स्वतः जरांगे पाटील यांनीही मला जोपर्यंत बोलायला येते तोपर्यंत चर्चेला या असे आवाहन सरकारला केले आहे.
समर्थ रामदास नसते, तर शिवराय झाले नसते; मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं वादग्रस्त विधान
या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले, जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम त्यांच्या सोबत आहे, शेवटी जीव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जरांगे पाटलांसोबत असणाऱ्या लोकांनीही त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातले आहे. जो काही योग्य निर्णय असेल तो घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, अशी माझी विनंती आहे, असे फडणवीस म्हणाले.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
मागील चार दिवसांपासून मनोज जरांगेंचं उपोषण सुरु असतानाच अद्याप सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे अखेर मनोज जरांगे यांनीच सरकारला चर्चेसाठी पुढील दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. पुढील दोन दिवस मी बोलू शकतो, काय बोलायचं असेल तर बोला, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मराठा आरक्षण : खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; दिल्लीत उपोषणही करणार!
तसेच सरकारला आरक्षण द्यायचं नसेल तर मराठ्यांचा सामना करावा लागणार आहे. कुणाचातरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. माझ्या हृदयाला काहीही होणार नाही. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल. मला काहीही झालं तरी मराठा समाज आंदोलन करणारच असल्याचे जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.