शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Eknath Shinde : राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या संकटकाळी सरकार शेतकऱ्यांच्या

Eknath Shinde : राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या संकटकाळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासाठी महायुतीचे सर्व मंत्री पूरग्रस्त जिल्ह्यांचा पाहणी दौरा करणार असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून दिलासा देणार असल्याचे सांगितले. आपण स्वतः ही धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत धाराशिव जिल्ह्याच्या दौरा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
मराठवाड्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून, याबाबत कालच आपण सर्व जिल्हाधिकाऱ्याशी फोनवरून बोलून त्यांच्याकडून याबाबत माहिती घेतली, उद्या आपण स्वतः धाराशिवला जाणार असून भूम, परांडा, कळंब या तालुक्याना भेट देणार असल्याचे सांगितले. मराठवाड्यातील सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ येथे काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे काही भागात संपूर्ण जमीन खरडून वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
आज पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत गांभीर्याने चर्चा झाली असून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जलदगतीने जमिनींचे पंचनामे करणे, जनावरांची हानी झालीय त्याला तातडीने मदत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महायुतीचे सर्वच मंत्री अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करणार असून. तिथे जाऊन स्थानिक अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे झालेले नुकसान जाणून घेतील. तसेच अतिवृष्टीनंतर साथींचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाल्याने आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) हे स्वतः मराठवाड्याचा दौरा करतील असेही शिंदे यांनी सांगितले. यावेळी परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), खासदार मिलिंद देवरा, आमदार मनिषा कायंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, कॅप्टन अभिजीत अडसूळ हेदेखील उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने मराठवाड्याकडे तातडीने मदत रवाना
शिवसेनेच्या वतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आज तातडीने मदत पाठवण्यात आली. शिवसेनेचे मुंबईतील कार्यालय बाळासाहेब भवन येथून हे मदतीच्या ट्रकला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून ही मदत धाराशिव जिल्ह्याकडे रवाना करण्यात आली.
मदत करता येत नसेल तर शेतकऱ्यांची थट्टा करु नका, रोहित पवार मंत्री गिरीश महाजनवर भडकले
यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून पाठवण्यात येणारं डॉक्टरांचे पथक, जीवनावश्यक वस्तूंची किट्स, इतर घरात लागणाऱ्या वस्तू आणि औषधांचा समावेश असेल असे 50 ते 60 ट्रक अतिवृष्टीग्रस्त भागात पाठवण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.