एक कोटी सह्यांद्वारे जनमत तयार करू, महिला आरक्षणासाठी सर्व महिलांना एकत्र येण्याचं फडणवीस यांचं आवाहन
महिला आरक्षण विधेयक हे शुद्ध भावनेतून आणि महिलांना संसदेत अधिक प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने तयार करण्यात आले होते.
Fadnavis appeals to all women :महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत महिलांना एकत्रित आणण्याची मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, महिला आरक्षण विधेयक हे शुद्ध भावनेतून आणि महिलांना संसदेत अधिक प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने तयार करण्यात आले होते. मात्र, हे विधेयक मंजूर न झाल्याने लोकशाहीतील महिलांच्या सहभागावर मोठा आघात झाला आहे. त्यांनी विरोधकांवर थेट आरोप करत म्हटलं की, ही केवळ राजकीय भूमिका नसून महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या आहे.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी परिसीमन आणि जनगणना महत्वाची होती. 1976 आणि 2002 प्रमाणेच नव्या लोकसंख्येच्या आधारावर जागांचे पुनर्वाटप होणे गरजेचे होते. दक्षिणेकडील राज्यांच्या आक्षेपांचा विचार करून, कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने जागा वाढवण्याचा संतुलित फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. त्यामुळे उत्तर-दक्षिण वाद टाळत सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.
तरी देखील, संसदेत या विधेयकाला आवशयक असलेली दोन-तृतीयांश बहुमत (352 मते) मिळू शकली नाहीत. विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली, तर विरोधात 231 मते पडली आणि त्यामुळे हे ऐतिहासिक विधेयक नामंजूर झाले. यावर तीव्र प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, आज संसदेत 73 महिला आहेत, हे विधेयक मंजूर झाले असते तर तब्बल 273 महिला संसदेत दिसल्या असत्या. त्यांनी पुढे सांगितले की, या विधेयकामुळे केवळ महिलांनाच नव्हे तर अनुसूचित जाती आणि जमातींच्या महिलांना देखील मोठा फायदा झाला असता. मात्र विरोधकांनी त्याला देखील अडथळा आणला.
राहुल गांधींना महिलांचा अपमान करण्याचा छंद; गोल्ड मेडलही त्यांनाच मिळेल, फडणवीसांनी वात पेटवली
या पार्श्वभूमीवर त्यांनी जनआंदोलनाच्या घोषणा केली. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही एक कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार आहोत. तालुका स्तरापर्यंत जनजागृती मोहीम राबवणार आहोत आणि महिलांना एकत्रित करून या विधेयकासाठी जन्मताच दबाव निर्माण करणार आहोत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच, महायुतीतील सर्व पक्ष एकत्र येऊन महिलांमध्ये जागृती करतील आणि विरोधकांचा महिला विरोधी चेहरा उघड करतील, असा इशारा देखील त्यांनी दिला.
शेवटी त्यांनी ठामपणे सांगितले की, जोपर्यंत लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार आहे. या घोषणेमुळे राज्यात महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर नव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.