तुम्ही सुरुवात केली आम्ही शेवट करू; आमच्या तरुणांना मारहाण, जरांगे पाटलांकडून फडणवीसांवर प्रहार
Manoj Jarange Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचं वाटोळ करायला लागले असल्याचं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. आमचा रस्ता बंद केला आहे. (Manoj Jarange) गावातून जाऊ दिलं जात नाही. सध्या मराठ्यांचं शोषण सुरु असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत. आता मराठ्यांना वाळीत टाकल्याचे जरांगे म्हणाले. मराठा समाज अन्याय सहन करणार नाही. आम्ही देखील जशास तसं उत्तर देणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.
आरक्षण न मिळाल्यास उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार; जरांगे पाटील सहाव्यांदा बसले उपोषणाला
भुजबळांनी थयथयाट केला असता
मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण मारलं आहे. हे जर मराठा समाजाने केलं असतं तर छगन भुजबळ यांनी किती थयथयाट केला असता असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. आता सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मराठा करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. आता आमचे रस्ते बंद केलेत, काही दिवसांनी आम्ही देखील तुमचे रस्ते बंद करु असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंमलबजावणी केल्याशिवाय हे आमरण उपोषण सुटणार नसल्याचंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आणि ओबीसी वाद नाही
मराठा आणि ओबीसी वाद नसल्याचं मनोज जरांगे यावेळी म्हणाले आहेत. मराठ्यांनी शांत राहावं असं आवाहन मी करत असल्याचं जरांगे म्हणाले. मराठा-ओबीसी कधीच भांडत नाहीत. हे छगन भुजबळांनी केलं असल्याचं जरांगे म्हणाले. मराठ्यांना आरक्षण दिल्यावर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. त्यामुळं भांडण वाढवण्याची गरज नाही. मराठ्यांच्या नोंदी सापडल्यावर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे हे ओबीसींना समजतं असं जरांगे पाटील म्हणाले.