एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 40 हजार कुणबी नोंदी पण…, छत्रपती शाहू महारांजाची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील काय म्हणाले?

माझी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, आठ दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे.

Jarange Patilll

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Jarange) हे कोल्हापूर दाैऱ्यावर आहेत. त्यांनी अगोदर अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते शाहू महाराजांचा भेटीला गेले. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. कोल्हापूरातील नवीन राजवाड्यात जरांगे यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. यादरम्यान माध्यमासोबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, इथे समाजाच्या हितावरच सर्वात जास्त चर्चा झाली. या राज्याला या देशाला राजश्री शाहू महाराज यांनीच आरक्षण दिलं आणि त्यांचेच हे गॅझेट आहे. त्यामुळं जर राज्यातील गोरगरीबांच्या लेकरांचं कल्याण होत असेल तर त्याच गॅझेटवर आमची सर्वात जास्त चर्चा झाली असं जरांगे म्हणाले.

आज चांगला योग आहे. शाहू महाराज यांच्यासोबत आम्ही खूप वेळ चर्चा केली. त्यांच्याकडूनही आरक्षणाबद्दलची गॅझेटबद्दलची खूप जास्त माहिती मिळाली. उपसमितीने विखे पाटील यांनी आणि शिंदे समितीने इथल्या कागदपत्रांकडं अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. लाखो गरीब मराठा समाजाच्या नोंदी इथे आहेत. आपण कोल्हापूरचे गॅझेट स्विकारावे आणि इथल्याही नोंदी घ्याव्यात. कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे. 1 लाख 40 हजार इथे शिंदे समितीने नोंदी शोधल्या आहेत. त्याचे आतापर्यंत 30 ते 35 हजारच कुणबी प्रमाणपत्र दिले आहेत. का दिले नाही याचे उत्तर मला माहिती नाहीये. ज्यांचे काहीच सापडले नाही, त्यांना आरक्षण देऊन ठेवले.

आता मला लोक पवारांचा माणूस म्हणतील; रोहित पवारांच्या आंदोलनात जरांगे पाटलांची टोलेबाजी

विखे पाटलांनी कोल्हापूर गॅझेटही स्वीकारावे. 3 लाख मराठा समाज एकटा कोल्हापूर जिल्ह्यातील आरक्षणात जाऊ शकतो, हे विखेंनी समजून घेणे खूप महत्वाचे आहे. आम्ही वारंवार ज्याकरिता यांच्यासोबत भांडत आहोत, हे त्यांना कळतच नाहीये. तुम्ही हे लक्षात घ्या की, आमची तळमळ कशात आहे. 58 हजार नोंदी सापडल्या आहेत. इथे आल्यावर मला समजले की, 1 लाख 40 हजार इथे नोंदी सापडल्या. 1 लाख नोंदी सापडल्या. ज्यांचे कधीच काही सापडले नाही, त्यांना आरक्षण देऊन बसला आहात. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 40 हजार नोंदी सापडल्या पण तुम्ही प्रमाणपत्र देत नाहीत, हा मराठा समाजावर किती मोठा अन्याय आहे. 4 लाखापेक्षाही जास्त प्रमाणापत्र एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात मिळू शकतात.

माझी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, आठ दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे. आठ दिवसाच्या आत प्रमाणपत्र द्यायचे, कारण नोंदी सापडल्या आहेत. पुढं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, आमच्या बऱ्याच मागण्यांबाबत जीआर काढले. जिवंत असेपर्यंत महामंडळ बंद पडू देणार नाही. कुणबी आणि मराठा अशी स्वतंत्र मंत्रालये उभी करावीत. आण्णासाहेब पाटील महामंडळ बंद पडू देणार नाही. असंही जरांगे म्हणाले.

Tags

follow us