सत्ताधारी पक्षाशी समन्वय साधण्याचा आग्रह; औंधमध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा

अलीकडेच झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत विकासकामांना गती देण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असा ठाम आग्रह व्यक्त करण्यात आला.

  • Written By: Published:
Untitled Design 49

party defection of Gayatridevi Pantpratinidhi : औंध आणि परिसरातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला असून, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. अलीकडेच झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत विकासकामांना गती देण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असा ठाम आग्रह व्यक्त करण्यात आला. या बैठकीत विविध गावांतील पदाधिकारी, शेतकरी प्रतिनिधी तसेच युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औंध परिसरात यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या विकासकामांना चालना मिळाली होती. रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा यांसारख्या क्षेत्रात काही प्रकल्प पूर्ण झाले असले, तरी अनेक योजना अजून देखील रखडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाशी जवळीक ठेवल्यास निधी आणि प्रशासकीय मंजुरी मिळण्यास वेग येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

औंध शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त हणमंतराव शिंदे यांनी बैठकीत स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रकल्प कागदावरच अडकले आहेत. राजकीय पातळीवर बदल घडवून आणल्याशिवाय या कामांना गती मिळणे कठीण आहे. त्यांनी विशेषतः औंधसह २१ गावांच्या शेतीसाठी पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. अपुऱ्या पाण्यामुळे शेती उत्पादन घाटात असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची खणत त्यांनी व्यक्त केली. याशिवाय, युवक कार्यकर्त्यांनी देखील रोजगारनिर्मिती, औद्योगिक विकास आणि स्थानिक पायाभूत सुविधांवर भर देण्याची मागणी केली.

फक्त राजकीय चर्चा नको, तर प्रत्यक्ष कामे दिसली पाहिजेत, असा सूर देखील बैठकीत उमटला. काहींनी तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठोस भूमिका घेण्याची गरज अधोरेखित केली. दरम्यान, अनेक कार्यकर्त्यांनी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सत्ताधारी यंत्रणेशी थेट समन्वय साधावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. कार्यकर्त्यांच्या भावना मला समजतात. त्यांच्या सूचनांचा मी गंभीरपणे विचार करत आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच त्यांनी स्पष्ट केले की, औंध परिसरातील विकासकामांबाबत मी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची लवकरच भेट घेणार आहे. त्या चर्चेनंतर पुढील दिशा निश्चित केली जाईल. सध्या कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. या संभाव्य राजकीय बदलामुळे औंध परिसरात उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक पातळीवर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, समर्थक आणि विरोधक दोघे देखील आपापली मते ठामपणे मांडताना दिसत आहेत. काही जण याला विकासासाठी आवश्यक पाऊल मानत असतानाच काही जण याकडे केवळ राजकीय सोयीसाठी घेतला जाणारा निर्णय म्हणून पाहत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जर गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर स्थानिक राजकारणातील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. त्यामुळे त्यांच्या अंतिम निर्णयाकडे केवळ औंधच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

follow us