मोठी बातमी! ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईतून अटक; मुंबई पोलिसांची कामगिरी
Lalit Patil Arrested : राज्याच्या राजकारणात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांना ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात यश मिळाले आहे. ललित पाटील हा काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. यासाठी दहा पथके तयार करण्यात आली होती. अखेर ललित पाटील पोलिसांच्या जाळ्याात सापडला. चेन्नई येथून त्याला अटक करण्यात आली. ललित पाटील याला लवकरच पुण्यात आणले जाणार असून त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
पुण्यात भीषण अपघात ! ट्रकला आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू
काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटजवळ दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. परंतु, या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील रुग्णालयातून फरार झाला होता. पोलिसांच्या सुरक्षेतून आरोपी फरार झाल्याने पोलिसांची मोठी नाचक्की झाली होती. तसेच विरोधकांनीही हे प्रकरण उचलून धरत सरकारवर गंभीर आरोप केले होते.
ललित पाटील हा चेन्नईत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. यानंतर आता त्याला पुण्यात आणलं जाणार आहे. येथे न्यायालयात हजर केले जाईल. याआधी आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती. यानंतर आता पोलिसांनी ललित पाटीललाही जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पोलीस आणखी तपास करतील. त्यामुळे आता तो आणखी कुणाची नावे घेतो, चौकशीतून काय माहिती हाती येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ललित पाटीलप्रकरणात भाजप मंत्र्याचा हात; रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप
दरम्यान, पंजाबनंतर पुण्यामध्ये ड्रग्जची तस्करी सुरू झाली आहे. अनेक पबमध्ये ड्रग्जची विक्री केली जात आहे. आज पुण्यात बाहेरून येऊन चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामुळे ड्रग्ज पुरवठा कसा होतो, ते रोखण्यासाठी गृहमंत्र्यांनी उपाययोजना करावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केली जात आहे.