महाराष्ट्रात सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्रे ‘या’ जिल्ह्यात वितरित; स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
Kunbi Certificate : मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या 81 व्यक्तींपैकी 80 जणांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचं अर्थसाहाय्य दिलं.
Kunbi Certificate : मराठा समाजाला कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत बीड जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक (Beed) प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत प्राप्त झालेल्या 2 लाख 10 हजार 941 अर्जांपैकी तब्बल 2 लाख 10 हजार 931 अर्ज मंजूर झाले आहेत. केवळ 10 अर्ज नामंजूर करण्यात आले असून, मंजुरीचे प्रमाण 99.99 टक्के आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे-पाटील उपस्थित होते.
प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी प्रशासनाने 28 लाख 83 हजार 261 अभिलेख्यांची तपासणी केली. यात 530 गावांमध्ये 22 हजार 333 नोंदी आढळल्या असून, त्या एनआयसी संकेतस्थळावर तसेच ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 2 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या सर्व 554 अर्जांची छाननी करून त्यांना तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे.
मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा; सारथी योजनेतून परदेशी शिक्षणाच्या शुल्काची मर्यादा हटवली
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 81 व्यक्तींपैकी 80 जणांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे. यातील 6 वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्यात आली असून, अन्य 23 वारसांना नोकरी देण्यासाठी 11 सप्टेंबर 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. उर्वरित वारसांनाही एमआयडीसी आणि एसटी महामंडळात नोकरी देण्याची कार्यवाही सुरू आहे.
11 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी 98 अर्ज प्राप्त झाले. यापैकी समितीमार्फत 79 आणि गॅझेटमार्फत 19 अर्ज दाखल झाले. पडताळणीनंतर समितीमार्फत प्राप्त 36 अर्जांना मंजुरी देण्यात आली. त्रुटींमुळे समितीचे 16 आणि गॅझेटकडील 2 अर्ज नाकारण्यात आले, तर समितीचे 27 आणि गॅझेटचा 1 अर्ज प्रलंबित आहे. त्या दिवशी विविध तालुक्यांत एकूण 18 विशेष शिबिरे घेण्यात आली.
प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्यासाठी 10 ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत सर्व महसूल मंडळांच्या स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांत जुने पुरावे शोधणे, अर्जांची छाननी करणे आणि पात्र लाभार्थींना जागेवरच प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जात आहे. या मोहिमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे-पाटील यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, 02442-252690 या हेल्पलाईनवर 16 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.