HMPV Virus : आरोग्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दात कमी केली मनातली भीती; पाहा व्हिडीओ
HMPV Virus : जगभरात HMPV विषाणुचा प्रसार वाढत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता महाराष्ट्रातही या विषाणुने शिरकाव केलायं. उपराजधानी नागपुरात दोन संशयित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागरिकांच्या मनातली भीती कमी केलीयं. HMPV हा विषाणू पूर्वीपासून जगभरात असून या विषाणुमूळे रुग्ण दगावत नसल्याने नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नसल्याचं आबिटकर यांनी स्पष्ट केलंय. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
#थेटप्रसारण
ह्युमन मेटान्युमो व्हायरस (HMPV) बाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची पत्रकार परिषद#HMPV
https://t.co/I7Y4Jl2F13— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 7, 2025
पुढे बोलताना आबिटकर म्हणाले, एचएमपीव्ही विषाणूचा चीनमध्ये प्रसार होत आहे. हा विषाणू गंभीर घेण्यासारखा नाही. पूर्वीपासून हा विषाणू जगभरात आहे. या विषाणूपासून धोका नाही. या आजारातून कोणताही रुग्ण न दगावता आजारातून बरा झालायं. त्यामुळे नागरिकांनी फार काळजी करण्याची गरज नाही , विलगीकरण, मास्कची गरज नसल्याचं आबिटकर म्हणाले आहेत. तसेच या विषाणुच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून निर्देश देण्यात आले असून या निर्देशाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
हा व्हायरस धोका नाही – मंत्री हसन मुश्रीफ
राज्य मंत्रिमंडळात या विषाणूबाबत परिस्थितीबाबत चर्चा झाली, घाबरण्याचे काही कारण नाही. कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. पाच रुग्ण आढळले एक बरा झाला असून हा व्हायरस धोकादायक नाही. सर्दी खोकला श्वसनाचे आजार असलेल्या व पाच वर्षाखालील व 65 वर्षा वरील रुग्णांनी काळजी घ्यावी. आपण कोरोनाशी लढा दिला आहे. औषधे व योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय.
सचिव निपुण विनायक म्हणाले, या विषाणुची वाढ अनैसर्गिक नाही. सर्व रुग्ण एचएमपीव्हीचे नाहीत हा विषाणू जगभरात 2001 पासून हा विषाणू आहे, त्यामुळे कोणतीही भीती नाही एचएमपीव्हीमुळे होणारा आजार सौम्य प्रकारे होतो, कोणताही गंभीर नाही. हवेतील संसर्गाने विषाणु पसरतो. या आजारामध्ये रुग्णाला सर्दी खोकला. तीन ते सहा दिवसानंतर प्रभाव दिसतो. राज्यात 2024 मध्ये 8052 पैकी 172 एचएमपीव्ही रुग्ण सापडले होते. काळजीचे कुठलेही कारण नाही . स्वच्छतेचे मुलभूत नियम पाळण्याची गरज असल्याचं निपुण विनायक यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, नागपुरातही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दोन्ही लहानग्यांना HMPV ची लागण झाल्याचं निदान 3 जानेवारीला झालं होतं. दोघांचाही HMPV चा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसत होती. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे.