मराठी तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही; रिक्षा चालकांबाबात मंत्री सरनाईकांचा मोठा निर्णय
जुजबी मराठी तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.
तुम्हाला प्रवाशांनी बोललेलं मराठी समजत (Marathi) नसेल किंवा बोलता येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इशारा दिला आहे. परंतु, 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू होत असलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयाला राज्य सरकारने एकप्रकारे 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याचे प्रताप सरनाईक यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं आहे.
यावेळी त्यांनी सरकारी मीरा भाईंदरमधील 562 रिक्षा चालकांविरोधात नोटीस काढणार असल्याची घोषणा केली. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत माझी बैठक झाली. मराठी भाषा आली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. व्यवसाय केला पाहिजे, पण मराठीच काय? २०१९ ला जे परिपत्रक काढलं होतं, तसेच 2020 मध्येही काढले होते. राज्यात मराठी बोलण्याच बंधन आहे. राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना आम्ही यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
मराठी सक्तीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची काय भूमिका? टॅक्सी, रिक्षा चालक नो टेन्शन
आपली मोहीम सुरु ठेवायची आहे. परिवहन विभागाच्या 20 नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई केली जाईल. 1 मे ते 15 ऑगस्ट या काळात ही मोहीम राबवली जाईल. या काळात आम्ही थेट कारवाई करणार नाही, पण ही मोहीम सुरु राहील. 100 दिवसांच्या या मोहीमेत सगळे रिक्षा आणि टॅक्सी चालक मराठी बोलतील. 100 दिवसांत कोणी जुजबी मराठी शिकू शकले नाही तर मग आपण बघू. परिवहन खात्यात तशी तरतूद आहे.
कोणी कितीही दबाव टाकला, कोणी कितीही बंदचं हत्यार उपसलं, कोणी कितीही आंदोलन करु म्हटलं तरी महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकलेच पाहिजे. आम्ही शिकवायला तयार आहोत, शिकून घ्या, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. कोणीही कितीही विरोध केला तरी प्रताप सरनाईक आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी भाषेचा आदर जी लोकं करतात, ज्यांना मराठी शिकायचं आहे, त्यांना शिकवलं जाईल. परंतु, जे कायद्याचे पालन करणार नाही, त्यांच्यावर आमच्या नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.
आमच्या परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रिक्षा आणि टॅक्सी चालक या मानसिकतेत आले आहेत की, महाराष्ट्रात आपल्याला राहायचं असेल, व्यवसाय करायचं असेल, आपल्याला मराठी बोलावं लागेल. कोणी मराठीत पीएचडी करा, एम.ए. करा, असे आम्ही सांगत नाही. पण प्रवाशांशी संवाद साधताना ते काय बोलत आहेत, हे तुम्हाला कळालं पाहिजे, तुम्ही काय बोललात हे प्रवाशांना कळालं पाहिजे. इतकं जुजबी मराठी तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.